देशाचा 80 वा स्वातंत्र्य दिन साजरा होत असतानाच चिपळूण शहरात समोर आलेल्या एका प्रकरणाने खळबळ उडाली. एका गाढवाच्या अंगावर भगवा, पांढरा आणि हिरवा रंग लावून तिरंग्याचा अपमान केल्याचा संतापजनक प्रकार घडला. मात्र पोलिस तपासात या प्रकरणामागे कोणताही राजकीय किंवा देशद्रोही हेतू नसून, केवळ खोडसाळपणा असल्याचे समोर आले आहे.
काय घडले?
चिपळूणमधील कावीळतळी परिसरात एका गाढवाच्या अंगावर तिरंग्याचे तीन रंग लावलेले दिसून आले होते. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. स्वातंत्र्य दिनाच्या तोंडावर झालेल्या या प्रकारामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आले होते.
पोलिस तपासात धक्कादायक सत्य
घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. CCTV फुटेज आणि स्थानिक चौकशीच्या आधारे पोलिसांनी या कृत्यामागे परिसरातीलच एक 10 वर्षीय मुलगा असल्याचे निष्पन्न केले. पोलिसांनी मुलाला आणि त्याच्या वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन धारेवर धरले. चौकशीत मुलाने आपण अजाणतेपणी हा प्रकार केल्याची कबुली दिली.
रंग धुवून माफी
पोलिसांनी मुलाच्या वडिलांनाही समज दिली. त्यानंतर मुलाने आणि कुटुंबियांनी तात्काळ गाढवाच्या अंगावरचा सर्व रंग पाण्याने धुवून काढला. तसेच यापुढे असे कृत्य होणार नाही, अशी हमीही पोलिसांना दिली आहे.
पोलिसांचा इशारा
या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला आणि त्याच्या पालकांना कायद्याची आणि देशभक्तीची जाणीव करून देत समज दिली आहे. “स्वातंत्र्य दिनासारख्या पवित्र दिवशी अशा प्रकारच्या खोडसाळपणाला थारा दिला जाणार नाही. देशाच्या चिन्हांचा आदर करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे” असे पोलिसांनी सांगितले.
