शांत रत्नागिरी शहराला गुरुवारी रात्री रक्ताने माखलेल्या हत्येने हादरवून सोडलं. कुवारबावच्या साईनगर परिसरात सात बंगल्यामागे एका 25 वर्षीय तरुणावर कोयत्याने सपासप वार करून त्याचा निघृण खून करण्यात आला. रात्रीच्या अंधारात घडलेल्या या थराराने संपूर्ण परिसरात दहशतीचं सावट पसरलं आहे.
रात्री 9.30 ते 11: मृत्यूचा थरार
मूळचा संगमेश्वरचा, पण सध्या विरार, मुंबईत राहणारा सूरज राजाराम झोरे (25) काही कामानिमित्त रत्नागिरीत आला होता. पण तो परत जाऊच शकला नाही. रात्री 9.30 ते 11 च्या दरम्यान दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्याला गाठलं आणि जुन्या वादातून थेट कोयत्याने वार केले. मानेवर, हातावर गंभीर घाव बसल्याने सूरज रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.
आरडाओरडा ऐकून लोकांनी धाव घेतली. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेलं, पण काळाने घाला घातलाच. अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि सूरजने प्राण सोडला.
बहिणीच्या फिर्यादीनंतर पोलिस अॅक्शन मोडवर
मृत सूरजची बहीण *नंदा रमेश फाले* यांनी दहिसरहून येऊन रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. तिघांनी मिळून भावाचा जीव घेतल्याची तक्रार देताच पोलिसांनी सूत्रे हलवली.
12 तासांत तिघे जेरबंद
रत्नागिरी पोलिसांनी जलद कारवाई करत *सोहम एकनाथ म्हात्रे, अभिषेक देवानंद राठोड* आणि *नजीबूल शेख ऊर्फ सोनू* या तिघा संशयितांच्या मुसक्या आवळल्या. मात्र खुनामागचं गूढ अजून कायम आहे.
जुना वाद, पैशाचं प्रकरण की ड्रग्ज कनेक्शन?
पोलिस उपनिरीक्षक सतीश शिंदे या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. जुनं भांडण, आर्थिक देवाण-घेवाण की अमली पदार्थांचं जाळं? हत्येमागचं खरं कारण काय याचा छडा लावण्यासाठी पोलिसांची पथकं कामाला लागली आहेत.
एका क्षुल्लक कारणातून भरवस्तीत कोयते चालल्याने रत्नागिरीकरांच्या मनात धडकी भरली आहे. शहरात वाढती गुन्हेगारी पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला असून पोलिसांनी कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
