महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील मंडळ अधिकारी श्री. जाधव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रकरण काय आहे?
तक्रारदाराने खरेदी केलेल्या जमिनीच्या खरेदीखताची सातबारा वरील नोंद गेल्या 2 वर्षांपासून प्रलंबित होती. यासाठी तक्रारदाराने मंडळ अधिकारी जाधव यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र काम करून देण्यासाठी जाधव यांनी 5 हजार रुपयांची लाच मागितली, असा आरोप आहे.
ACB ने रचला सापळा
कंटाळलेल्या तक्रारदाराने याबाबत रत्नागिरी ACB कार्यालयात तक्रार दिली. तक्रारीची खात्री झाल्यानंतर ACB ने बुधवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सावर्डे येथे सापळा लावला. यावेळी जाधव हे लाचेचे 5 हजार रुपये स्वीकारत असतानाच ACB च्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले.
नागरिक संतप्त
या घटनेमुळे महसूल विभागाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांची कामे मुद्दाम रखडवून पैसे मागितले जात असल्याचा आरोप होत आहे. प्रामाणिक नागरिकांना होणाऱ्या मानसिक त्रासामुळे आरोपी मंडळ अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
ACB कडून पुढील तपास सुरू आहे.
