रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची खुर्ची अद्याप रिक्त आहे. या पदासाठी नामदार भरत शेठ गोगावले यांचे नाव आघाडीवर आहे, मात्र शासनाचा अंतिम निर्णय झालेला नाही. तरीही 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अलिबागच्या पोलीस परेड मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहणाचा मान त्यांना मिळाला.
रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी ध्वजारोहण केले. यावेळी बोलताना त्यांनी रायगडचा सर्वांगीण विकास ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. नागरिकांचा सहभाग, योग्य नियोजन, उत्पन्न वाढ आणि विकास प्रकल्पांचा पाठपुरावा या चार मुद्द्यांवर त्यांनी भर दिला.
रायगड जिल्ह्यातील 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. अटल सेतू, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सागरी मार्गांमुळे जिल्ह्याचा विकास होत असून ‘तिसरी मुंबई’ रायगडमध्ये आकार घेत असल्याचे ते म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत रायगडच्या 1859 शेतकऱ्यांना 10 कोटी 95 लाख रुपये देण्यात आले आहेत. ग्रामविकासात खालापूरच्या खरीवली आणि वासांबे ग्रामपंचायतींनी देशात प्रथम क्रमांक पटकावला. महिलांसाठी 4 लाख 76 हजार लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत.
15 ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह आणि 21 ऑगस्टला महा वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्यासह अधिकारी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर गोगावले यांच्या हस्ते वरसोली येथील जिल्हा परिषद शाळेत इंग्लिश लँग्वेज लर्निंग लॅबचे लोकार्पण करण्यात आले.
