आमदार शेखर निकम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. राज्य शासनाने चिपळूण तालुक्याला दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर केले आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यंदाच्या पावसाळ्यात चिपळूण तालुक्यात पावसाने मोठा खंड दिला होता. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने भातशेतीसह नागली, वरी या पारंपरिक पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी पेरणी करूनही पीक हातात आले नाही. शेतकरी वर्ग अडचणीत आला होता.
ही बाब लक्षात घेऊन आमदार शेखर निकम यांनी सुरुवातीपासूनच हा विषय शासन दरबारी लावून धरला होता. त्यांनी विधिमंडळात याबाबत आवाज उठवला होता. तसेच मंत्रालयात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्री यांची वारंवार भेट घेऊन चिपळूण तालुक्यातील पाहणी अहवाल सादर केला होता. तालुक्याला दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करण्याची मागणी त्यांनी केली होती.
अखेर शासनाने त्यांच्या मागणीची दखल घेत चिपळूण तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर केले आहे. या निर्णयामुळे आता तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. यामध्ये पीक विम्याची मदत, पिक कर्जाचे पुनर्गठन, कृषी वीज बिलात सूट, महसूल माफी, रोहयो कामात वाढ आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात सवलत यासारख्या सवलती मिळणार आहेत.
दरम्यान, हा निर्णय झाल्यानंतर आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्री यांचे आभार मानले आहेत. शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून योग्य निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.
