घरची चूल पेटवण्यासाठी रोज विजेच्या खांबावर जीव धोक्यात घालणाऱ्या एका तरुणाचा काळाने शुक्रवारी सायंकाळी घात केला. दापोली तालुक्यातील गव्हे ब्राह्मणवाडीचा लेक संकेत हरिश्चंद्र पवार (वय 34) याचा मुरुड येथे कामावर असताना विजेचा जोरदार झटका बसून जागीच दुर्दैवी अंत झाला. या घटनेने संपूर्ण गव्हे गावावर शोककळा पसरली असून पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
काय घडलं नेमकं?
संकेत पवार गेली अनेक वर्षे वीज वितरण कंपनीच्या एका खाजगी ठेकेदाराकडे वायरमन म्हणून काम करत होता. शुक्रवारी सकाळीही तो नेहमीप्रमाणे सहकाऱ्यांसोबत मुरुड परिसरात दुरुस्तीच्या कामासाठी गेला होता. सायंकाळच्या सुमारास विजेच्या पोलवर चढून काम करत असताना अचानक काळाने झडप घातली. अचानक आलेल्या हायव्होल्टेज करंटने संकेतला जोरदार झटका बसला. सहकाऱ्यांनी आरडाओरडा करत त्याला खाली उतरवलं, वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण नियतीला हे मान्य नव्हतं. जागीच त्याची प्राणज्योत मालवली. एका क्षणात हसता-खेळता संकेत कुटुंबाला कायमचा पोरका करून गेला.
गावात हळहळ, कुटुंब उघड्यावर
संकेतच्या मृत्यूची बातमी गव्हे गावात पोहोचताच एकच आक्रोश उठला. घरचा कमावता मुलगा गेल्याने पवार कुटुंबीयांवर आभाळ कोसळलं आहे. अवघ्या 34 व्या वर्षी संसाराची जबाबदारी खांद्यावर घेऊन राबणारा संकेत आता फक्त आठवणींत उरला आहे.
या घटनेमुळे खाजगी कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सुरक्षेची साधने होती का? शटडाऊन घेतला होता का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
