चिपळूण/पेण : अभियंता दिनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाचा यंदाचा २०२५-२६ चा राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट पूल’ पुरस्कार रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील भोगावती नदीवरील उच्चस्तरीय पुलाला जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे ज्या काळात या पुलाची उभारणी झाली, त्या काळात या कामाचे नेतृत्व सध्या चिपळूण सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेले श्री. सुखदेवे यांनी अलिबाग विभागात असताना केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बांधलेला पूल राज्यात उत्कृष्ट ठरल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
काय आहे या पुलाची कहाणी?
पेण – तरणखोप – बोरगाव हा अतिशय महत्त्वाचा रस्ता. या रस्त्यावरील इजिमा ४६ वर भोगावती नदी आहे. पूर्वी येथे कमी उंचीचा अरुंद बुडीत पूल होता. त्यामुळे हेटवणे धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यावर हमखास पूर यायचा आणि पूल पाण्याखाली जायचा. परिणामी तरणखोप, मुंगोशी, बेलवडे, धवनसर, प्रधानवाडी, ढवराळ, दर्गावाडी या सात-आठ गावांचा पेण शहराशी संपर्क पूर्णपणे तुटायचा. ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून जावे लागायचे किंवा ३ किलोमीटरचा मोठा वळसा घालावा लागायचा.
ही अडचण स्थानिक आमदार रवी पाटील यांनी शासन दरबारी मांडली. त्यांच्या पाठपुराव्यातून नाबार्ड-२८ अंतर्गत या कामाला मंजुरी मिळाली. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी या ठिकाणी केवळ पूल न बांधता ‘पूल कम बंधारा’ ही संकल्पना राबवण्याची सूचना केली. या संकल्पनेला तत्कालीन अभियंता म्हणून श्री. सुखदेवे यांनी प्रत्यक्षात उतरवले.
१०० मीटर लांबीचा १० गाळ्यांचा पूल आणि त्यालाच जोडून १०० मीटर लांब व १.५० मीटर उंचीचा बंधारा असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे. पेण बाजूस ८० मीटर तर तरणखोप बाजूस ५५ मीटर काँक्रिटचा जोडरस्ता करण्यात आला आहे. सुमारे ४.२५ कोटी रुपये खर्चाच्या या कामात पुलासाठी ४.०३ कोटी तर बंधाऱ्यासाठी २२ लाख रुपये खर्च झाला असून रामेश्वर कन्स्ट्रक्शन, पेण या संस्थेने हे काम पूर्ण केले.
या ‘पूल कम बंधाऱ्या’मुळे अनेक फायदे झाले. एक तर दुहेरी वाहतूक सुरू होऊन दळणवळणाचा प्रश्न कायमचा मिटला. ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ हे शासनाचे धोरण यशस्वी झाले. बारमाही पाणीसाठा तयार झाल्याने आजूबाजूच्या विहिरींची पाणीपातळी वाढली, मासेमारीला चालना मिळाली, पेण नगरपालिकेच्या आठवडा बाजारासाठी पाणी उपलब्ध झाले, गणेश विसर्जनासाठी हक्काचा घाट तयार झाला आणि बोटिंग व सुशोभीकरणामुळे पर्यटनाचीही संधी निर्माण झाली.
अभियांत्रिकी कौशल्य, सामाजिक उपयुक्तता आणि नाविन्यपूर्ण संकल्पना या त्रिसूत्रीवर या पुलाची निवड उत्कृष्ट पूल म्हणून करण्यात आली आहे. १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिनी या पुरस्काराचे वितरण होणार असल्याचे समजते.
