गुहागर तालुक्यातील एका जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील गंभीर प्रकरणात चिपळूण येथील विशेष न्यायालयाने आरोपी शिक्षकाला अखेरची शिक्षा सुनावली आहे. दुसरीत शिकणाऱ्या चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी शिक्षक उदय नामदेव वेल्हाळ याला जन्मठेप आणि दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश डी. बी. म्हालटकर यांनी हा निकाल दिला.
आईच्या जागरूकतेने गुन्हा उघड
ही घटना मार्च २०२० मधील आहे. ७ मार्च २०२० रोजी शाळेतून घरी आलेल्या मुलीच्या हालचालीत बदल दिसल्याने आईने तिच्याकडे विचारपूस केली होती. त्यातून हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो कायद्यासह भारतीय दंड विधानाच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
आईच्या निधनानंतरही न्यायालयीन लढा सुरू
खटला सुरू होण्यापूर्वीच पीडित मुलीच्या आईचे निधन झाले होते. मात्र खटला थांबला नाही. सरकारी पक्षाकडून एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील पुष्पराज शशिकांत शेट्ये यांनी सरकार पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली. पुरावे आणि साक्षीच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी धरत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
तपास पथकाचे कौतुक
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विनी पाटील यांनी केला होता. तर न्यायालयीन प्रक्रियेत पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल पी. भंडारी आणि ए. एस. शिंदे यांनी काम पाहिले.
