चिपळूण तालुक्यातील अनधिकृत चिरा दगड खाणींमुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते विद्याधर दत्ताराम साळुंखे हे राज्यमंत्री गृह (शहरे), महसूल व ग्रामविकास मंत्री मा. योगेशदादा कदम यांच्याकडे मांडण्यासाठी प्रयत्न करत होते. याचाच गैरफायदा घेत संशयित आरोपी रविराज चिखले याने स्वतःला मंत्री महोदयांचा पी.ए. असल्याचे खोटे भासवले. तो प्रत्यक्षात मंत्री महोदयांचा पी.ए. नसतानाही, मंत्री महोदयांची भेट घडवून देतो आणि तुमचे काम करून देतो, असे आश्वासन त्याने फिर्यादींना दिले.
५ हजार उकळून फसवणूक
या कामासाठी संशयिताने दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी खेड येथे फिर्यादीकडून ५,००० रुपये रोख रक्कम घेतली. मात्र त्यानंतर मंत्री महोदयांची कोणतीही भेट घडवून न आणता आणि कोणतेही काम न करता फिर्यादीची फसवणूक केली.
या प्रकारानंतर सामाजिक कार्यकर्ते विद्याधर साळुंखे यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी संशयित आरोपी रविराज चिखले याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.
