राजकारणात मतभेद असले तरी मनभेद नसावेत याचा आदर्श काल सोमवारी चिपळूणमध्ये पाहायला मिळाला. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या 33 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आमदार शेखर निकम यांचे सुपुत्र अनिरुद्ध निकम यांनी उपस्थित राहून सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला. तर दुसरीकडे चव्हाण आणि यादव फॅमिलीनेसुद्धा त्यांचे उस्फूर्त स्वागत केले. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून निकम विरुद्ध यादव यांच्यातील राजकीय संघर्ष संपुष्टात येऊन या दोन्ही परिवारात दिल’जमाई’ झाल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.
चिपळूणच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात महत्त्वाचे स्थान असलेल्या चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा 33 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाला सहकार क्षेत्रातील मान्यवरांसह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या मंचावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्यासह त्यांच्या पत्नी सौ. स्मिता चव्हाण, त्यांचे जावई तथा भाजपचे नेते प्रशांत यादव, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या त्यांच्या कन्या सौ. स्वप्ना यादव आणि ऍड. नयना पवार या उपस्थित होत्या.
मात्र, या कार्यक्रमात विशेष लक्ष वेधून घेतले ते आमदार शेखर निकम यांचे चिरंजीव अनिरुद्ध निकम यांनी होय. दोन वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत आमदार शेखर निकम आणि प्रशांत यादव यांच्यात अत्यंत चुरशीची आणि चर्चेची लढत झाली होती. त्यामुळे या दोन्ही कुटुंबात राजकीय स्पर्धा आहे. असे असतानाही अनिरुद्ध निकम यांनी कोणताही राजकीय आकस न ठेवता कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यांनी मंचावरील सर्व मान्यवरांशी आपुलकीने संवाद साधला, सुभाषराव चव्हाण आणि स्मिता चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या आणि पतसंस्थेच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. प्रशांत यादव, सौ. स्वप्ना यादव यांच्याशीही त्यांनी दिलखुलास चर्चा केली.
अनिरुद्ध निकम हे नव्या पिढीचे युवा नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या कृतीतून त्यांचा व्यापक दृष्टिकोन दिसून येतो. निवडणुकीतील स्पर्धा ही निवडणुकीपुरतीच मर्यादित असावी, तालुक्याच्या विकासासाठी आणि सहकाराच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे, हाच संदेश त्यांनी या कृतीतून दिला.
त्यांच्या या उपस्थितीचे व्यासपीठावरील मान्यवरांनीही स्वागत केले. या एका भेटीमुळे चिपळूणच्या राजकारणातील कटुता कमी होऊन एका नव्या, निरोगी आणि सकारात्मक राजकीय संस्कृतीची सुरुवात होईल, अशी चर्चा आता नागरिकांमध्ये रंगली आहे.
