मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. वालोपे येथील एचपी पेट्रोल पंपासमोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार थेट 25 ते 30 फूट खोल खड्ड्यात कोसळली. या अपघातात चिपळूणच्या एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दोन लहान मुलांसह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
पहाटे 4.25 वाजता घडली घटना
मुंबईहून चिपळूणकडे निघालेली एमएच 08 बीई 1742 क्रमांकाची कार पहाटे सुमारे 4.25 वाजता वालोपे येथे आली असता चालकाचे नियंत्रण सुटले. क्षणार्धात कार रस्त्यालगतच्या खोल खड्ड्यात जाऊन आदळली. अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
तातडीने मदतकार्य, जखमींना रुग्णालयात दाखल
माहिती मिळताच जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्थेची रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पोहोचली. जखमींना प्रथमोपचार करून लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
एक ठार, पाच जखमी
या अपघातात मार्कंडी, चिपळूण येथील संजय जाधव यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
जखमींमध्ये अप्रीन सावंत (44, मुंबई), रिधा मोडक (28, मुंबई), उजर मुल्ला (9, चिपळूण), रिया मुल्ला (36, चिपळूण) आणि आईन मुल्ला (4, चिपळूण) यांचा समावेश आहे. लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. पहाटेच्या वेळी झालेल्या या भीषण अपघाताने महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
