कोकणच्या निसर्गसौंदर्यात आता चित्रपटसृष्टीचे नवे पर्व सुरू होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पालशेत येथे १२५ एकर जागेवर राज्य सरकारकडून प्रस्तावित असलेल्या फिल्म सिटी प्रकल्पाच्या निर्मितीला लवकरच सुरुवात होणार आहे.
कोकणातील निसर्गरम्य लोकेशन्समुळे अनेक चित्रपट, वेब सिरीज आणि जाहिरातींचे चित्रीकरण यापूर्वीच रत्नागिरी, सिंधुदुर्ग परिसरात झाले आहे. मात्र हक्काची फिल्म सिटी नसल्याने निर्मात्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. हीच गरज ओळखून राज्य सरकारने गुहागर तालुक्यातील पालशेत येथे फिल्म सिटी उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रकल्पामुळे केवळ चित्रपटसृष्टीच नाही तर संपूर्ण गुहागर आणि पालशेत परिसराचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे.
या प्रकल्पाचे फायदे काय?
या फिल्म सिटीमुळे स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. चित्रीकरण, सेट डिझाईन, लाईट, कॅमेरा, हॉटेल व्यवसाय, वाहतूक अशा अनेक क्षेत्रात रोजगार निर्मिती होईल.
याशिवाय कोकणातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळणार आहे. पालशेतचा समुद्रकिनारा आणि निसर्गसौंदर्याच्या पार्श्वभूमीवर उभी राहणारी ही फिल्म सिटी रत्नागिरीच्या विकासात मैलाचा दगड ठरणार आहे. एकंदरीत, प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात येणार असल्याने कोकणवासीयांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
