चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या ३३ व्या वर्धापन दिन, सहकार मेळावा व प्रगतशील शेतकरी आणि यशस्वी व्यावसायिक सन्मान सोहळा बहादूरशेखनाका येथील सहकार भवन सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या स्थापनेमागचा उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले, “चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेमागे सर्वसामान्यांना आर्थिक मदत करून त्यांना सक्षम बनवणे, त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हाच मुख्य उद्देश होता. केवळ कर्ज वाटप करणे हा उद्देश कधीच नव्हता.
गेल्या ३३ वर्षात आम्ही या उद्देशाला धरून अनेक शेतकरी आणि कुटुंबांना उभे करण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे. अनेकांना सावकारीच्या विळख्यातून सोडवून स्वतःच्या पायावर उभे केले आहे. यापुढेही हे कार्य आम्ही अधिक गतिमान करणार आहोत.
तसेच आता वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात सहकाराचा एक नवा आदर्श निर्माण करण्याची संधी आपल्यासमोर आहे. त्यामुळे वैयक्तिक वाद-विवाद बाजूला ठेवून सर्वांनी एकजुटीने, एकदिलाने काम करणे गरजेचे आहे. आपण सर्व एकत्र आलो तरच आपल्याला कोकणाच्या विकासात मोलाचे योगदान देता येईल.”
मान्यवरांनी केला गौरव
यावेळी व्यासपीठावर भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, संचालिका सौ. स्मिता चव्हाण, सेवानिवृत्त अपर आयुक्त एस.बी. पाटील, मिलिंद सोबले, डॉ. सोपान शिंदे, ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट (बिळाशी), अॅड. नयना पवार उपस्थित होते.
यावेळी एस.बी. पाटील म्हणाले की, चिपळूण नागरी सलग ३० वर्षे १५ टक्के डिव्हिडंड देणारी महाराष्ट्रातील एकमेव पतसंस्था आहे. तर बाबासाहेब परीट यांनी सुभाषराव चव्हाण यांचा ‘देवमाणूस’ असा गौरव करत, ही पतसंस्था शेड्युल बँक दर्जाचे काम करत असल्याचे सांगितले.
सीईओ सौ. स्वप्ना यादव म्हणाल्या, “तीन तपांचा हा प्रवास म्हणजे विश्वासार्हतेचा प्रवास आहे. सभासदांचा विश्वास हेच आमचे खरे भांडवल आहे.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले.
