पतीचे नाव सातबारा उताऱ्यावर दाखल करून फेरफार मंजूर करण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच घेताना राजापूर तालुक्यातील तळवडे मंडळ अधिकारी आणि मिळंद सजातील कोतवाल यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहात पकडले. या धडक कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. संजना नंदकुमार माने (वय 41) कोतवाल, तलाठी सजा मिळंद आणि पुनम जससिंग गावीत (वय 37) मंडळ अधिकारी, तळवडे मंडळ अशी लाचखोरांची नावे आहेत.
काय आहे प्रकरण?
तक्रारदार महिलेच्या मौजे जवळेथर, ता. राजापूर येथील वडिलोपार्जित जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर पतीचे नाव नव्हते. नाव दाखल करून फेरफार मंजूर करून घेण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. 13 मे रोजी चौकशीसाठी तक्रारदार तलाठी कार्यालय मिळंद येथे गेल्या असता कोतवाल संजना माने यांनी मंडळ अधिकारी पुनम गावीत यांच्या वतीने फेरफार मंजूर करण्यासाठी *25 हजार रुपयांची मागणी* केली.
ACB ने असा रचला सापळा
तक्रारदार महिलेने तातडीने ACB कडे धाव घेतली. 14 मे रोजी ACB ने पडताळणी केली असता तडजोडीनंतर 20 हजार रुपयांवर लाच निश्चित झाल्याचे निष्पन्न झाले.
गुरुवारी ACB ने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे कोतवाल संजना माने यांनी पंचासमक्ष तलाठी कार्यालयातच तक्रारदाराकडून 20 हजारांची लाच स्वीकारली. रक्कम हातात पडताच माने यांनी मंडळ अधिकारी पुनम गावीत यांना फोन करून “पैसे मिळाले” असे कळवले. गावीत यांनीही फोनवरून संमती देताच दबा धरून बसलेल्या ACB पथकाने दोघींनाही जागेवरच ताब्यात घेतले.
दोन्ही आरोपींविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या कारवाईमुळे तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
