चिपळूण शहराच्या मध्यवर्ती भागातील एका हॉटेलमध्ये देहव्यापार सुरू असल्याचा आरोप करत रत्नागिरी एलसीबी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या छाप्यात 39 वर्षीय एका महिलेला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
काय घडलं?
चिपळूणमधील एका हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर कथितपणे वेश्या व्यवसाय चालतो असल्याची गुप्त माहिती रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने सापळा रचून त्या ठिकाणी धाड टाकली.
तपासादरम्यान तेथे अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
मुंबईहुन आणली तरुणी
चौकशीत अटक केलेल्या महिलेने मुंबईतील 23 वर्षीय एका तरुणीला या कामासाठी चिपळूणला आणल्याचे उघड झाले. त्या तरुणीकडून जबरदस्तीने हा व्यवसाय करून घेत असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
पुढे काय?
बुधवारी अटक करण्यात आलेल्या 39 वर्षीय महिलेला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिची दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. तर पीडित 23 वर्षीय तरुणीची सुटका करून तिला पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
या कारवाईमुळे चिपळूण शहरातील हॉटेल व्यवसायांवर पोलिसांची नजर अधिक कडक होण्याची शक्यता आहे.
