मुंबई-गोवा महामार्गावर कापसाळ यशोधन नगर समोर शनिवारी सायंकाळी झालेल्या दुचाकी अपघात एका अपंग दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. महेश गुढेकर असं मयत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडे सातच्या सुमारास महेश गुढेकर यांची दुचाकी रस्त्याच्या डिव्हायडरवर चढली. तोल जाऊन ते रस्त्यावर जोरात डोक्यावर आपटले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मात्र अपघातस्थळी उपस्थित नागरिकांमध्ये अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाल्याचीही चर्चा सुरू होती. अपघात नेमका कसा झाला याबत पोलीस तपास करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच चिपळूणचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी तातडीने पोलिसांचे पथक घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी पंचनामा करून अपघाताचा अधिक तपास सुरू केला आहे.
मयत महेश गुढेकर हे कापसाळ डीगेवाडी येथे भाड्याने राहत होते. शहरातील एका पेट्रोल पंपावर काम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या अपघाती निधनाने गुढेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
