यंदाच्या गौरी-गणपती सणासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी सुविधा करण्यात आली आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मुंबईतून कोकणाकडे जाणाऱ्या 5 विशेष ‘मोदी एक्स्प्रेस’ गाड्या सोडण्याची माहिती दिली. चिपळूणच्या पत्रकारांनी नुकतीच श्री. राणे यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.
पत्रकारांशी बोलताना मंत्री राणे म्हणाले की, मागील वर्षी गणपतीसाठी 2 मोदी एक्स्प्रेस सोडल्या होत्या. कोकणातील जनतेने त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. त्यामुळेच यावर्षी गाड्यांची संख्या वाढवून 5 करण्यात आली आहे.
“कोकणातील जनतेचे आमच्यावर असलेले प्रेम अतुलनीय आहे. त्यांच्या सोयीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत” असे मतही त्यांनी व्यक्त केले.
या पत्रकार भेटीत मंत्री राणे यांनी आपल्या खात्याच्या कामकाजाची माहिती देणारी पुस्तिका देखील उपस्थितांना भेट दिली. यावेळी त्यांनी बंदरे आणि मत्स्य विभागामार्फत मच्छीमार बांधवांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजना आणि कोकणाच्या सर्वांगीण विकासावर भर दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी आभार मानले. तसेच माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे साहेब कायमच कोकणच्या विकासाचा विचार करतात आणि त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे” असे गौरवोद्गारही काढले.
