उन्हाळी सुट्टीत गावी आलेली मजा क्षणात मातीमोल झाली. खेड तालुक्यातील धामणंद गावात सोमवारी संध्याकाळी काळाने घाला घातला. काजू फाटा परिसरातील नागझरी नदीच्या डोहात बुडून 15 वर्षीय मुलीसह गुहागरच्या दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. एकाच कुटुंबावर आभाळ कोसळलं आणि संपूर्ण खेड तालुका हळहळला.
पाण्याचा अंदाज चुकला, तिघे गेले काळाच्या पडद्याआड
मृतांमध्ये लावण्या विजय पार्टे (15, रा. साखर-खेड), नितीन सूर्यकांत जाधव (38) आणि विराज किशोर जाधव (12, दोघेही रा. गुहागर) यांचा समावेश आहे. सुट्टीसाठी गावी आलेले हे तिघे सोमवारी संध्याकाळी नागझरीच्या डोहात पोहण्यासाठी उतरले. पण पाण्याची खोली आणि भोवऱ्याचा अंदाज न आल्याने तिघेही गटांगळ्या खाऊ लागले.
आरडाओरडा ऐकून ग्रामस्थांनी धाव घेतली. जीवाच्या आकांताने मदतीसाठी प्रयत्न केले, पण काळापुढे कोणाचं काही चाललं नाही. तिघांचेही मृतदेह बाहेर काढताना उपस्थितांचे काळीज पिळवटलं.
20 दिवसांपूर्वीही त्याच डोहाने घेतला होता 12 वर्षीय मुलीचा बळी!
धक्कादायक बाब म्हणजे याच नागझरी डोहात अवघ्या 20 दिवसांपूर्वी एका 12 वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाला होता. महिनाभरात दुसरी घटना घडल्याने धामणंदसह पंचक्रोशीत भीतीचं वातावरण आहे. हा डोह आता ‘मृत्यूचा सापळा’ बनलाय का, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
ग्रामस्थांचा संताप: “डोहात उतरण्यास तात्काळ बंदी घाला!”
वारंवार दुर्घटना होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाला जाब विचारला आहे. “आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागं होणार? या डोहात पोहण्यासाठी तात्काळ बंदी घाला, धोक्याचे फलक लावा,” अशी जोरदार मागणी होत आहे.
खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे. एकाचवेळी तीन मृत्यूंमुळे धामणंद गावावर शोककळा पसरली असून कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे.
