गुहागर तालुक्यातील कुटगिरी गावठाणवाडी परिसरात आज एक दुर्दैवी घटना घडली. नदीवरील जुना लोखंडी पूल अचानक कोसळल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी एका बैलाचा बळी गेला आहे.
दुपारच्या सुमारास हा पूल मोठ्या आवाजासह नदीत कोसळला. त्यावेळी पुलावरून सुमारे 10 ते 12 गुरे जात होती. ती सर्वच जड लोखंडी गर्डरखाली सापडली. या अपघात दिलीप गुरव यांचा एक बैल जागीच ठार झाला. इतर जनावरे अजूनही गर्डरखाली अडकून आहेत.
घटना कळताच गावकऱ्यांनी तातडीने धाव घेतली. काही तरुणांनी जीव धोक्यात घालून नदीत उड्या मारल्या आणि अडकलेल्या गुरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र नदीचा वाढता प्रवाह आणि कोसळलेले टनांनी वजनाचे लोखंडी साहित्य यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. क्रेनशिवाय सर्व जनावरांना बाहेर काढणे शक्य नसल्याचे दिसते.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पूल गावासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. शेती, स्मशान आणि दैनंदिन वाहतुकीसाठी गावातील लोक गेली 10-12 वर्षे याच पुलाचा वापर करत होते. काही दिवसांपूर्वीच या पुलाचे सर्वेक्षण झाले होते आणि नवीन पूल मंजूर होण्याच्या प्रक्रियेत होता.
धोकादायक स्थिती लक्षात येताच ग्रामस्थांनी स्वतःच्या खर्चाने जेसीबी आणि वेल्डिंग करून पूल तात्पुरता सावरला होता. पण प्रशासनाकडून कायमस्वरूपी तोडगा निघाल्याने आज ही दुर्घटना घडली, असा आरोप गावकरी करत आहेत.
“आमचा जीवनदुवा असलेला पूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोसळला. याला जबाबदार कोण?” असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी केला आहे.
