भारत सरकारच्या जनगणना 2027 मोहिमेचा पहिला टप्पा असलेल्या ‘स्वगणना’ प्रक्रियेत चिपळूण तालुक्यातील दळवटणे गावाने इतिहास रचला आहे. जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला शंभर टक्के प्रतिसाद देत गावातील सर्व 425 कुटुंबांची नोंदणी पूर्ण करणारे दळवटणे हे *रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले गाव* ठरले आहे. गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे दळवटणे आता ‘आदर्श गाव’ म्हणून संपूर्ण जिल्ह्यासमोर आले आहे.
1 ते 15 मे दरम्यान मोहीम, 12 मे लाच 100% पूर्ण
जनगणना 2027 च्या पूर्वतयारीसाठी 1 मे ते 15 मे 2026 हा कालावधी ‘स्वगणना’ साठी निश्चित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या नेतृत्वाखाली व पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते 1 मे रोजी मोहिमेचा शुभारंभ झाला. उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दळवटणे गावाची पथदर्शी गाव म्हणून निवड करण्यात आली. प्रशासनाच्या जनजागृतीला प्रतिसाद देत गावाने मुदतीच्या 3 दिवस आधीच 100% उद्दिष्ट गाठले.
लोकसंख्या 1871 वरून 2262 वर
2011 च्या जनगणनेनुसार 1871 लोकसंख्या असलेल्या दळवटणेत ताज्या स्वगणनेनुसार आता 2262 नागरिक राहतात. 9 वाड्यांमधील 425 कुटुंबांची नोंदणी पूर्ण झाली आहे. स्थलांतर, सामाजिक बदल आणि कुटुंब रचनेचे अचूक चित्र यामुळे समोर आले आहे.
वाड्यानिहाय कामगिरी अशी
शेट्येवाडी 18, गणेशवाडी 51, बागवाडी 67, रामवाडी 18, भुवडवाडी 64, नलावडेवाडी 101, बडदेवाडी 35, राजवाडा 22 आणि बौद्धवाडी 49 कुटुंब.
या टीममुळे शक्य झाले यश
तहसीलदार प्रवीण लोकरे व मंडळ अधिकारी नारायण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगणक वैशाली पेड्डेवाड, सचिन जाधव, प्रिया मोरे यांनी घरोघरी जाऊन नोंदणी केली. मदतनीस शीतल कराडकर, रोशनी जाधव, ऋतुजा इंगवले, मेघना नलावडे, सुप्रिया बोबले, अर्चना जाधव, सीमा गमरे, सुवर्णा जाधव व पोलीस पाटील अमित मोहिते यांनी तांत्रिक मदत केली.
“दळवटणे गावाने दाखवलेली तत्परता आणि प्रशासनाशी साधलेला समन्वय कौतुकास्पद आहे. इतर गावांनीही हा आदर्श घ्यावा,” असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ग्रामीण भागात डिजिटल प्रक्रियेबाबत जागरूकता वाढत असल्याचे हे सकारात्मक उदाहरण ठरले आहे.
