श्री स्वामी समर्थ महाराजांचे मानसपुत्र श्री स्वामीसुत महाराज ज्यांनी आपल्याला महाराजांचे श्री स्वामी समर्थ हे नाव दिले ज्यांनी श्री स्वामी समर्थ संप्रदायाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र दिला आणि ज्यांनी सर्व प्रथम अक्कलकोट येथे स्वामी जयंती ची सुरवात केली अशा श्री स्वामीसुत महाराज यांच्या पादुका आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या स्पर्श पादुका यांचे पूजन व दर्शन सोहळा शुक्रवार, ७ ऑगस्ट २०२६ रोजी चिपळूण येथे प्रथमच आयोजित करण्यात आला आहे. तब्बल १६० वर्षांनंतर प्रथमच होत असलेल्या या ऐतिहासिक आणि पावन सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट, मुंबई – शाखा चिपळूण यांच्या वतीने करण्यात आले आहे.
हा विशेष दर्शन सोहळा दुपारी १२ ते १ या वेळेत स्वामी समर्थ मठ मार्कंडी, चिपळूण येथे आणि १ ते २ या वेळेत महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या सभागृह पाग, चिपळूण येथे संपन्न होणार आहे. मुंबईस्थित चिपळूण शाखेचे पदाधिकारी श्री. उमेशदादा वाजे यांच्या संयोजनातून हा पादुका दर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याला श्री. विजय हरिभाऊ नलावडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मुंबापुरी गादीचे मठाधिपती असून श्रीस्वामीसुत महाराजांचे वंशज आहेत. चेंबूर मठाचे प्रमुख असलेले विजयदादा नलावडे यांनी आयोजकांच्या विनंतीला मान देत चिपळूण शाखेच्या सभागृहात पादुका दर्शन सोहळा घेण्यास सहमती दर्शविली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीस्वामीसुत महाराजांच्या पादुका मुंबईहून राजापूरकडे नेण्यात येणार असून, त्या मार्गात चिपळूण येथे स्वामीभक्तांना दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशीर्वादाने पूजनीय मानल्या जाणाऱ्या या पादुकांचे दर्शन घेण्याची संधी अत्यंत दुर्मिळ मानली जात आहे. १६० वर्षांनंतर प्रथमच चिपळूणमध्ये हा सोहळा होत असल्याने संपूर्ण परिसरातील स्वामीभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पावन सोहळ्यास सर्व स्वामीभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पादुका दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन चिपळूण शाखेचे कार्याध्यक्ष श्री. मनोज भोजने यांनी केले आहे.
