महाबळेश्वर तालुक्यातील बामणोली येथे बुधवारी सायंकाळी कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात मोठा अपघात झाला. मुंबईहून आलेल्या दोन पर्यटकांना घेऊन जाणारी बोट अचानक आलेल्या वादळी वाऱ्यात उलटली.
सुदैवाने दोन्ही पर्यटकांनी पोहून किनारा गाठला आणि ते बचावले. मात्र बोट चालवणारा रुपेश धोंडीबा तांबे हा तरुण बेपत्ता झाला आहे. स्थानिक बोट क्लबचे सदस्य आणि महाबळेश्वर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
नेमकं काय घडलं?
काल सायंकाळी सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वारा आणि पावसाने जोर धरला. महाबळेश्वर-बामणोली परिसरातही सोसाट्याचा वारा सुटला होता. त्याचवेळी तापोळ्यातील शिवसागर बोट क्लबची एक बोट मुंबईच्या दोन पर्यटकांना घेऊन जलाशयात फिरत होती. सावरी गावाजवळील नवीन पुलाजवळ बोट वादळात सापडली आणि उलटली. दोन्ही पर्यटक पोहत बाहेर आले, पण चालक रुपेशचा पत्ता लागला नाही.
2 वर्षांपूर्वीही अशीच दुर्घटना
शिवसागर जलाशयात ही पहिलीच घटना नाही. 2024 मध्येही तापोळा ते बामणोली मार्गावर तेटली गावाजवळ वादळामुळे एक स्पीड बोट बुडाली होती. त्यात एकाचा मृत्यू झाला होता, तर दोघे वाचले होते. ती बोट पुलाच्या सर्व्हेच्या कर्मचाऱ्यांना घेऊन परत येत होती.
जल पर्यटनावर परिणाम
सध्या कोयना धरणातील पाणीसाठा खूप कमी झाला आहे. त्यामुळे जिथे पाणी आहे तिथेच बोटिंग सुरू आहे. उन्हाळा आणि पाणी कमी झाल्याने पर्यटकही घटले आहेत. बऱ्याच बोटी नादुरुस्त अवस्थेत किनाऱ्यावर बांधून ठेवल्या आहेत. महाबळेश्वर पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थ सकाळपासून रुपेश तांबेचा शोध घेत आहेत.
