मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील नातुनगर धरण परिसरात गुरुवारी सायंकाळी काळाने घाला घातला. मुंबईहून खेडच्या दिशेने भरधाव येणाऱ्या झायलो कारने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या एलपीजी गॅस टँकरला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात भोस्ते मोहल्ला येथील 33 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर 4 आणि 7 वर्षांच्या दोन चिमुकल्यांसह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
सायंकाळी 5:40 वाजता घडली घटना
नातुनगर स्टॉपजवळ सायंकाळी 5:40 च्या सुमारास हा हृदयद्रावक अपघात घडला. एमएच 08 झेड 3692 क्रमांकाची झायलो कार भरधाव वेगात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट महामार्गालगत उभ्या असलेल्या गॅस कंटेनरवर जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की कारचा पुढील संपूर्ण भाग चक्काचूर झाला.
एक ठार, तिघे गंभीर
या अपघातात सबिया मारुख जसनाईक (वय 33, रा. भोस्ते मोहल्ला) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर इमरान मुरात जसनाईक (वय 45), अब्दुल अच्चीस जसनाईक (वय 4) आणि सेहरा मारुख जसनाईक (वय 7) हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना भरणे येथील यश हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत
घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या भीषण अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
महामार्गावर उभ्या असलेल्या अवजड वाहनांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
