सातारा-पुणे महामार्गावरील सुरूर येथे शनिवारी सकाळी झालेल्या भीषण कार अपघातात चिपळूण येथील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिघे जण जखमी झाले. चालकाला प्रवासादरम्यान डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मुंबईहून चिपळूणकडे निघालेले वैभव वामन कदम (वय ४५) हे कुटुंबीयांसह कारने प्रवास करत होते. सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांची कार सुरूर परिसरात आली असता चालकाला अचानक झोपेची डुलकी लागली. त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगातील कार सर्व्हिस रोडलगत असलेल्या दुभाजकाला जोरदार धडकली.
धडक इतकी भीषण होती की, कार रस्त्यावर तीन वेळा पलटी झाली. कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
या अपघातात वैष्णवी वैभव कदम (वय ४३) आणि विजय धोंडू पवार (वय ७०) या दोघांचा मृत्यू झाला. दोघेही चिपळूण येथील रहिवासी होते. तर चालक वैभव कदम (वय ४५), वैशाली विजय पवार (वय ६२) आणि वेदांत वैभव कदम (वय १३) हे तिघे जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. पलटी झालेल्या कारमधील जखमींना बाहेर काढून सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या दुर्घटनेमुळे चिपळूणमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
