प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून एकाच कुटुंबाला लक्ष्य करत जीवघेणा हल्ला केल्याची अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना चिपळूण शहरात बुधवारी घडली आहे. भरदिवसा, भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण चिपळूणमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
भेंडीनाका येथे सुरू झालेला किरकोळ वाद काही वेळातच गोवळकोट बायपासवरील एन्रॉन पुलाजवळ मोठ्या हिंसाचारात बदलला. या घटनेत एका महिलेसह एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी सात जणांविरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. यापैकी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित पाच जणांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
फिर्याद नेमकी काय आहे?
या प्रकरणी सानिया फैजान चौगले (वय २२, रा. खेर्डी मोहल्ला, चिपळूण) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून २५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९ वाजून ३३ मिनिटांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७२/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत सानिया यांनी असा आरोप केला आहे की, त्यांनी फैजान चौगले यांच्याशी प्रेमविवाह केला, याचाच राग आरोपींच्या मनात होता. याच कारणावरून वारंवार वाद होत होता आणि अखेर या रागाचाच उद्रेक बुधवारी झालेल्या हल्ल्यात झाला.
भेंडीनाक्यावर नेमकं काय झालं?
फिर्यादीनुसार, २५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सानिया आणि त्यांचे पती फैजान हे भेंडीनाका येथून दुचाकीवरून जात होते. अचानक त्यांची मोटारसायकल बंद पडली.
त्यावेळी तिथे असलेल्या आरोपींपैकी एकाने सानिया यांच्याकडे पाहून हसल्याचा आरोप फिर्यादीत आहे. याबाबत फैजान यांनी विचारणा केली असता वाद वाढला. आरोपीने फैजान यांचा शर्ट पकडून धक्काबुक्की केली आणि शिवीगाळ केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकारानंतर सानिया यांनी आपल्या सासरच्या मंडळींना फोन करून माहिती दिली आणि भेंडीनाका येथे येण्यास सांगितले.
एन्रॉन पुलाजवळ हल्ला
दरम्यान, सानिया यांना फोनवरून अशी माहिती मिळाली की, गोवळकोट बायपासवरील एन्रॉन पुलाजवळ आरोपींकडून कुटुंबातील सदस्यांना मारहाण सुरू आहे.
ही माहिती मिळताच सानिया आणि अन्य कुटुंबीय तात्काळ घटनास्थळी पोहोचले. तिथे पोहोचल्यानंतर आरोपींनी सानिया यांच्यासह फैजान आणि अन्य कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी कोयता, लोखंडी रॉड आणि लाकडी काठ्यांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. यावेळी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही उल्लेख आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती.
कोण जखमी झाले?
या हल्ल्यात एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले आहेत.
फैजान चौगले, सानिया फैजान चौगले, रेहान साबळे, सऊद चौगले
,सलमा चौगले हे ते पाचजण आहेत. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे.
कोणावर गुन्हा दाखल?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सात जणांना आरोपी करण्यात आले आहे.
भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९(१), १८९(१), १८९(२), १९१(१), १९१(२), १९०, ११८(१), ११८(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कलमांमध्ये खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव, गंभीर दुखापत, धमकी आणि शिवीगाळ यांसारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे.
दोन संशयित ताब्यात, पाच फरार
या हल्ला प्रकरणातील सात जणांपैकी दोघांना चिपळूण पोलिसांनी मुंबईच्या दिशेने जात असताना ताब्यात घेतले आहे. त्यांना अटक करून पुढील चौकशी सुरू आहे.
उर्वरित पाच संशयित अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना झाली आहेत. पोलीस आरोपींच्या नातेवाईकांकडे आणि संभाव्य ठिकाणी तपास करत आहेत.
बुलडोझर कारवाईचीही चर्चा
या कोयता हल्ला प्रकरणानंतर संबंधित फळ दुकानावर करण्यात आलेल्या बुलडोझर कारवाईचीही चिपळूण शहरात मोठी चर्चा झाली होती. नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या पुढाकाराने ही कारवाई झाल्याचे सांगितले जात आहे.
ही कारवाई आणि हल्ला प्रकरण यांचा नेमका संबंध काय आहे, याबाबतही शहरात उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
चिपळूणमध्ये संताप
प्रेमविवाहासारख्या वैयक्तिक कारणावरून सुरू झालेला वाद थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचल्याने चिपळूणकरांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. प्रेमविवाह करणाऱ्या तरुण-तरुणींना अशा पद्धतीने लक्ष्य केले जात असेल तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
या हल्ल्यामागील नेमकी पार्श्वभूमी काय आहे, सर्व संशयितांचा सहभाग किती होता, आणि घटनेत आणखी कोणी सहभागी होते का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. उर्वरित पाच संशयितांना पोलीस कधी ताब्यात घेतात, याकडे संपूर्ण चिपळूणचे लक्ष लागले आहे.
