चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथून बेपत्ता झालेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा अखेर शोध लागला आहे. मुंबईच्या अंधेरी परिसरातून मुलगी आणि तिच्यासोबत असलेला युवक पोलिसांना सापडले असून, दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
सावर्डे येथून मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेला २४ तास उलटूनही मुलीचा शोध लागत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली होती.
या पार्श्वभूमीवर रत्नागिरी, चिपळूण आणि सावर्डे पोलिसांनी संयुक्तिक कारवाई सुरू केली. क्यूआरटी पथकासह पोलिसांची विशेष पथके मुलीचा कसून शोध घेत होती.
इंस्टाग्राम स्टोरी ठरली कारणीभूत
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवकाने सावर्डे येथील एका मुलाची इंस्टाग्रामवरील स्टोरी पाहिली. त्या स्टोरीवरून त्याचे लोकेशन समोर आले. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी अंधेरी परिसरात सापळा रचून युवकाला ताब्यात घेतले. यावेळी मुलगीही त्याच्यासोबत असल्याचे समजते.
या संयुक्त कारवाईमुळे पोलिसांना अवघ्या काही तासांत यश मिळाले असून, सावर्डे गावातील तणाव निवळला आहे. सध्या अल्पवयीन मुलगी आणि त्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक
रत्नागिरी, चिपळूण आणि सावर्डे पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मुलगी सुखरूप सापडली. या जलद आणि संयुक्त कारवाईबद्दल पोलीस दलाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.