मुंबई-गोवा हायवेवर रविवारी रात्री काळोखात टँकरच्या राक्षसी धडकेने चिपळूण-वालोपे येथील आग्रे कुटुंब उद्ध्वस्त झालं. होमगार्ड कुणाल आग्रे आपल्या पत्नी आणि 4 वर्षांच्या चिमुकली गार्गीसोबत घरी परतत असताना मागून आलेल्या भरधाव टँकरने त्यांच्या गाडीचा चुराडा केला. धडक इतकी भीषण होती की 4 वर्षांची गार्गी जागीच ठार झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाप-लेकीला पाहून गावकऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडाला. गंभीर जखमी कुणाल आग्रेंनी रुग्णालयात नेताच अखेरचा श्वास घेतला. एका क्षणात हसतं-खेळतं कुटुंब संपलं. आता आई रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतेय.
संतापाचा उद्रेक: महामार्ग 3 तास ठप्प!
या हृदयद्रावक घटनेनंतर वालोपेचा संताप अनावर झाला. “आता किती बळी घेणार?” असा सवाल करत शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. मुंबई-गोवा हायवेवर रास्ता रोको करत महामार्ग पूर्ण ठप्प केला. दोन्ही बाजूला 6 किमी वाहनांच्या रांगा लागल्या. प्रवासी ताटकळले, पण गावकऱ्यांचा आक्रोश थांबेना.
“वारंवार अपघात होतात, प्रशासन झोपलंय का? स्पीडब्रेकर नाही, दुभाजक नाही, सुरक्षेचे नाव नाही. आमच्या लेकरांचे जीव स्वस्त आहेत का?” असा जाब ग्रामस्थांनी विचारला.
अखेर अडीच तासांनी पोलिसांनी समजूत काढून वाहतूक सुरू केली. टँकर चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
