रत्नागिरी जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने बालविवाह लावून तिच्यावर महिनोनमहिने अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी 22 वर्षीय तरुणावर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अवघी 17 वर्षे 16 दिवसांची आहे. वैद्यकीय तपासणीत ती 16 आठवड्यांची गरोदर असल्याचं स्पष्ट झालं आहे.
काय आहे प्रकरण?
पीडित मुलगी आणि संशयित आरोपी रोहित अशोक भुटिया (22, रा. दिवळिया, सुरेंद्रनगर, गुजरात, सध्या रा. रत्नागिरी) हे दोघेही एकाच समाजाचे आहेत. डिसेंबर 2025 मध्ये संगमेश्वर तालुक्यातील गणेशआळी बाजारपेठेतील गणपती मंदिराजवळील राहत्या घरीच दोघांचा बालविवाह उरकण्यात आला.
मुलगी अल्पवयीन असल्याचं माहिती असतानाही आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यातूनच ती गरोदर राहिली आणि हा सगळा प्रकार बाहेर आला.
गुजरातमध्ये खोटा जबाब, रत्नागिरीत सत्य उघड
धक्कादायक बाब म्हणजे, 13 मे 2026 रोजी गुजरातमधील लकतर पोलीस ठाण्यात चौकशीवेळी पीडितेने पोलिसांना सांगितलं की लग्न आणि संबंध गुजरातमध्येच झाले. मात्र कारवाईच्या भीतीपोटी तिने खोटं सांगितल्याचं नंतर स्पष्ट झालं. भावाने आणि मावशीने समजूत काढल्यानंतर तिने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात येऊन खरा प्रकार सांगितला.
या कलमांखाली गुन्हा दाखल
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात ‘झिरो’ नंबरचा गुन्हा नोंदवून तो पुढील तपासासाठी संगमेश्वर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. आरोपी रोहित भुटियावर भारतीय न्याय संहिता कलम 64(2)(i), 64(2)(m), पॉक्सो कायद्याचं कलम 4, 6, 8 तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्याचं कलम 9, 10*अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक *आर. एस. गावीत* पुढील तपास करत आहेत. आरोपीच्या अटकेचे प्रयत्न सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
