चिपळूण शहरातील पॉवरहाऊस नाका येथील सर्व्हिस रोडवर बेशिस्तपणे वाहने लावून वाहतूक कोंडी करणाऱ्यांवर चिपळूण पोलिसांनी मंगळवारी दणका दिला. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व्हिस रोडवर उभ्या असलेल्या 6 गाड्यांवर कारवाईचा बडगा उगारला आणि 6 हजार रुपयांचा दंड ठोठावला.
पोलीस अधीक्षक बगाटेंच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
सर्व्हिस रोडवर गाड्या लावल्यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना अडचणी येत असल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बेले व पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पॉवरहाऊस नाक्यावर छापा टाकला.
पोलीस हेडकॉन्स्टेबल नाळे, पोलीस हेडकोन्स्टेबल अभिजीत सकपाळ व पोकॉ वागदकर यांनी सर्व्हिस रोडवर बेकायदा उभ्या असलेल्या 6 वाहनांवर तात्काळ खटले दाखल केले. प्रत्येकी 1000 रुपये प्रमाणे एकूण 6 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
गाडी मालकांना फोनवरून समज
कारवाईदरम्यान पोलिसांनी संबंधित गाडी मालकांशी फोनद्वारे संपर्क साधला. “पुन्हा सर्व्हिस रोडवर गाडी उभी करू नका, अन्यथा आणखी कडक कारवाईला सामोरे जावे लागेल,” अशी सक्त ताकीद पोलिसांनी दिली.
नागरिकांमधून समाधान
पॉवरहाऊस नाका हा शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग आहे. सर्व्हिस रोडवर वाहने उभी राहिल्याने पादचाऱ्यांना चालणे आणि इतर वाहनांना ये-जा करणे कठीण झाले होते. पोलिसांच्या या तडकाफडकी कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. यापुढेही अशी बेशिस्त वाहने दिसल्यास थेट कारवाई करण्याचा इशारा चिपळूण पोलिसांनी दिला आहे.
