अल-मदीना वेल्फेअर असोसिएशनच्या एम.आय. हजवानी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, खेड येथील विद्यार्थिनी कु. आफिफा कादीर तिसेकर हिने SSC 2025-26 परीक्षेत 99.40% गुण मिळवत राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. खेडसारख्या ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन राज्यस्तरावर झळकल्याने आफिफाचे यश संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरले आहे.
विषयनिहाय गुणांची बरसात
आफिफाने विज्ञान विषयात 100 पैकी 100 गुण मिळवत परिपूर्ण कामगिरी केली. गणितात 98, मराठीत 98, सामाजिक शास्त्रात 98 आणि हिंदी-उर्दूमध्ये 96 गुण मिळवत तिने सर्वच विषयांत निर्विवाद वर्चस्व गाजवले.
शाळा-संस्थेकडून अभिनंदनाचा वर्षाव
“तुझी मेहनत, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळेच हे यश शक्य झाले,” अशा शब्दांत शाळा व्यवस्थापनाने आफिफाचे अभिनंदन केले. JMBR ग्रुप व बी. एम. हजवानी फाऊंडेशनच्या वतीनेही तिचे विशेष कौतुक करण्यात आले. आफिफाच्या यशाने तालुक्यातील इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
कुटुंबीयांच्या आशीर्वादामुळेच यश: आफिफा
यशाचे श्रेय आई-वडील आणि आजीला देताना आफिफा म्हणाली, “माझ्या SSC परीक्षेत मिळालेल्या यशामागे माझी आजी सौ. झैनबबी हिशामुद्दीन तिसेकर, वडील श्री. कादिर हिशामुद्दीन तिसेकर आणि आई सौ. नदिरा कादिर तिसेकर यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांनी मला नेहमी प्रेम, प्रोत्साहन आणि योग्य मार्गदर्शन दिले. त्यांच्या आशीर्वाद, मेहनत आणि विश्वासामुळेच मी हे यश मिळवू शकले.”
“तिसेकर परिवारातील सर्व सदस्यांचे आणि तिसे गावातील सर्व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार. तुमच्या शुभेच्छा, प्रेम आणि पाठिंब्यामुळे मला नेहमी प्रेरणा मिळाली. माझ्या यशात तुमचा मोठा वाटा आहे,” अशी कृतज्ञताही तिने व्यक्त केली.
“माझ्या सर्व शिक्षकांचे, प्राचार्यांचे आणि व्यवस्थापनाचे मला मोलाचे मार्गदर्शन मिळाले. जिद्द, चिकाटी आणि माझी मेहनत यांसोबतच सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळे मला हे यश मिळाले,” असेही आफिफाने सांगितले.
चिपळूणशी नाते
आफिफा ही चिपळूणमधील आरिफा रहिमान बिजले यांची नात असून माजी नगराध्यक्षा रिहाना असलम बिजले यांची भाची आहे. तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल समस्त बिजले आणि तिसेकर कुटुंबीयांकडून तिच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
