मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा निष्काळजीपणाचा बळी गेला आहे. राजापूर तालुक्यातील ओणी पुलावर लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या आयशर चालकाला पाठीमागून भरधाव आलेल्या दुसऱ्या आयशरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सावंतवाडीतील 38 वर्षीय दत्तप्रसाद सुरेश परुळेकर यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलगाव, सावंतवाडी येथील दत्तप्रसाद परुळेकर हे आपला आयशर टेम्पो घेऊन मुंबईहून गोव्याकडे निघाले होते. पहाटे ओणी पुलावर आल्यानंतर त्यांनी लघुशंकेसाठी टेम्पो बाजूला उभा केला आणि खाली उतरले. इतक्यात पाठीमागून सुसाट येणाऱ्या दुसऱ्या आयशर टेम्पोने आधी उभ्या टेम्पोला, मग बाहेर उभ्या असलेल्या दत्तप्रसाद यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भयंकर होती की दत्तप्रसाद यांचा जागेवरच प्राण गेला.
घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. धडक देणाऱ्या आयशरचा चालक गोविंद कांबळे, रा. वेंगुर्ला याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दत्तप्रसाद यांच्या अकाली निधनाने कोलगाव आणि संपूर्ण सावंतवाडी तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे. कुटुंबाचा आधारस्तंभ हरपल्याने परुळेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ओणी पुलासारख्या अरुंद ठिकाणी, महामार्गाच्या कडेला वाहन उभे करणे जीवघेणे ठरू शकते. भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांचा अंदाज न आल्याने असे अपघात घडतात. चालकांनी शक्यतो पेट्रोल पंप किंवा सुरक्षित ठिकाणीच वाहने थांबवावीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
