“माझं गाव आरोग्य संपन्न गाव ही शासनाची योजना केवळ बक्षीसापुरती मर्यादित न राहता ती लोकचळवळ बनली पाहिजे. लोकप्रतिनिधी, पत्रकार, नागरिक आणि आरोग्य विभाग यांनी एकजुटीने काम केल्यास चिपळूण तालुका या अभियानात नक्कीच अव्वल ठरेल,” असा विश्वास जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य विनोद झगडे यांनी व्यक्त केला.
प्राथमिक आरोग्य केंद्र दादर आणि जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळी ग्रामपंचायत कार्यालयात ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या जनजागृतीसाठी कार्यशाळा उत्साहात पार पडली. यावेळी झगडे बोलत होते.
“प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर” – डॉ. कांचन मदार
कार्यक्रमात कामथे उपजिल्हा रुग्णालयाच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कांचन मदार यांनी अभियानाची पंचसूत्री समजावून सांगितली. स्वच्छता, शुद्ध पाणी, वैयक्तिक आरोग्याची काळजी आणि प्रतिबंधात्मक आरोग्य यांचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. “प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. प्रत्येकाने आपल्या गावाला आरोग्यदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन करून त्यांनी उपस्थितांना ‘माझं आरोग्य मी चांगलं राखेन’ अशी शपथही दिली.
पत्रकारांचा पुढाकार, मान्यवरांची उपस्थिती
जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूणने जनजागृतीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल विनोद झगडे यांनी विशेष कौतुक केले. अभियान लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील साळवी, कार्याध्यक्ष सतीश कदम, ज्येष्ठ पत्रकार मकरंद भागवत, सरपंच अंजली जांभुर्गे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधा गुंजाळ यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेला पं. स. सदस्य सुप्रिया देवरुखकर, समुदाय आरोग्य अधिकारी प्रज्ञा यादव, जिजाऊ ब्रिगेडच्या मिलन गुरव, ग्रा.पं. सदस्य रवींद्र सागवेकर, माजी सरपंच मीनाक्षी कोठारे, तंटामुक्त समिती अध्यक्षा सुषमा कोठारे, पोलीस पाटील दिपाली बाबर, ग्रामसेवक कदम, आरोग्य सहाय्यक अभिजित यादव, राजेंद्र मोलाज यांच्यासह पत्रकार ललेश कदम, ओंकार रेळेकर, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश बांडागळे यांनी केले, तर आभार संतोष पिलके यांनी मानले.
