मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. शुक्रवारी पहाटे सहा वाजता खेड तालुक्यातील भरणे नाका येथे भरधाव स्विफ्ट कार उभ्या असलेल्या खासगी लक्झरी बसवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात मुंबईहून सावर्ड्याला निघालेले 5 प्रवासी गंभीर जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
चालकाचे नियंत्रण सुटले, कार बसवर जाऊन धडकली
मुंबईहून सावर्ड्याच्या दिशेने जाणारी मारुती स्विफ्ट कार भरणे नाक्याजवळ आली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. महामार्गाच्या कडेला उभी असलेल्या लक्झरी बसला कारने पाठीमागून इतकी जोरदार धडक दिली की आवाजाने संपूर्ण परिसर हादरला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
गाडीचा चक्काचूर, 45 मिनिटे रेस्क्यू ऑपरेशन
धडक इतकी भीषण होती की स्विफ्ट कारच्या बॉनेटचा अक्षरशः चक्काचूर झाला. पाचही प्रवासी आतमध्ये अडकून पडले. घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण होते. माहिती मिळताच मदत ग्रुपचे प्रसाद गांधी, जगद्गुरु श्री नरेंद्राचार्य महाराज संस्थेची रुग्णवाहिका, 108 रुग्णवाहिका, भाजपचे वैभव खेडेकर आणि खेड पोलीस तातडीने दाखल झाले.
स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी जवळपास पाऊण तास शर्थीचे प्रयत्न करून गाडी कापून अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर सर्व जखमींना तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
जखमींची नावे
1. परशुराम खराडे
2. अनुज चाकळे
3. मनीषा परशुराम स्मारे
4. प्रतिक्षा खराडे
5. शिल्पा खराडे / जनार्दन
सर्व जखमी मुंबईहून सावर्डे येथे निघाले होते. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. खेड पोलीस पुढील तपास करत आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर पहाटेच्या वेळी होणारे अपघात वाढले असून चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे, उभ्या वाहनांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलीस करत आहेत.
