“इटलीतून हद्दपार झालेली ‘मिटेनी’ कंपनी लोटेत आली आणि आता ‘पिफास’ नावाच्या फॉरेव्हर केमिकलने कोकणचा श्वास गुदमरतोय” – या भावने पेटून उठलेल्या कोकणकरांनी आता आरपारची लढाई सुरू केली आहे. लोटे MIDC मधील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीतून निघणाऱ्या विनाशकारी ‘पिफास’ केमिकलविरोधात कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीने 10, 11, 12 मे रोजी चिपळूणमध्ये भव्य स्वाक्षरी मोहिमेची घोषणा केली आहे.
‘फॉरेव्हर केमिकल’चा धोका काय?
पिफास (PFAS) हे केमिकल ‘कधीच नष्ट न होणारे’ म्हणून ओळखले जाते. पाणी, माती, हवा आणि मानवी शरीरात कायम राहून कॅन्सर, किडनीचे आजार, जन्मजात व्यंग यांसारखे महाभयंकर परिणाम यामुळे होतात. इटलीतून हद्दपार झालेली ‘मिटेनी’ कंपनीच लोटे येथे लक्ष्मी ऑरगॅनिकच्या माध्यमातून हे केमिकल बनवत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी करत आहेत.
सहा महिन्यांपासून लढा सुरू, आता स्वाक्षरी युद्ध
“आपल्या पुढच्या पिढीने मोकळा श्वास घ्यावा, त्यांना गंभीर आजार होऊ नयेत” या एकमेव उद्देशाने गेले सहा महिने कोकणातील सामाजिक संस्था, नागरिक जीवाची पर्वा न करता लढत आहेत. पक्षविरहीत, निस्वार्थीपणे सुरू असलेल्या या लढ्याचा हा पुढचा टप्पा आहे.
यापूर्वी खाडीपट्ट्यातील कोतवली, सोनगाव, लवेल या गावांमध्ये हुसैनभाई दलवाई यांच्या नेतृत्वाखाली जनजागृती सभा घेतल्या. नागरिकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर या लढ्याचे प्रतिनिधी अशोक जाधव व सहकारी गेले 100 दिवस धरणे आंदोलन करत आहेत.
10 मे रोजी सकाळी 9 वाजता शुभारंभ
आता या लढ्याला अधिक बळ देण्यासाठी 10, 11, 12 मे असे तीन दिवस चिपळूण नगरपालिकेसमोरील खेडेकर संकुल येथे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे. 10 मे रोजी सकाळी 9 वाजता सर्व पर्यावरण प्रेमी, सामाजिक संघटना एकत्र येऊन या मोहिमेचा शुभारंभ करतील.
“हा लढा सार्वजनिक आहे, कोकण वाचवण्याचा आहे. सर्व चिपळूणकर बंधू-भगिनी, युवक-युवती, पर्यावरण प्रेमींनी मोठ्या संख्येने येऊन स्वाक्षरी करावी आणि सक्रिय सहभाग नोंदवावा,” असे कळकळीचे आवाहन कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीच्या रविना गुजर यांनी केले आहे.
पुढे काय?
समितीने स्पष्ट केले आहे की ही स्वाक्षरी मोहीम म्हणजे ‘हरित स्वप्नांचे बीज’ आहे. निसर्ग हा जीवनाचा आत्मा आहे आणि कोकणचे सुंदरपण टिकवण्यासाठी, लक्ष्मी ऑरगॅनिकमधील पिफास निर्मिती पूर्णपणे बंद होईपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे.
