शांत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला हादरवून सोडणारी घटना वर्दे गावात घडली आहे. हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या दामिनी पालव हिची तिच्यासोबतच शिकणाऱ्या साहिल धुरी याने धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी दामिनी ही नेहमीप्रमाणे एसटीने कडावल येथे उतरून वर्दे येथील आपल्या घराकडे पायी जात होती. याच दरम्यान निर्मनुष्य वाटेवर साहिलने तिला अडवले. दोघांमध्ये झालेल्या वादानंतर साहिलने तिच्यावर हल्ला करून तिची हत्या केली आणि घटनास्थळावरून पळ काढला. काही वेळातच ही बातमी गावात पसरली.
गरीबीतून बाहेर पडण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं
दामिनीच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तिचे वडील रंगकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गरिबीतून बाहेर पडून मोठ्या शहरात नोकरी करावी आणि कुटुंबाला आधार द्यावा, हे दामिनीचे स्वप्न होते. रोज वर्दे ते पिंगुळी असा एसटीचा प्रवास आणि पायपीट करून ती शिक्षण घेत होती.
हॉटेल मॅनेजमेंटची पदवी मिळवून कुटुंबाची जबाबदारी घेण्याची तिची तयारी होती, मात्र तिचं हे स्वप्न अर्धवटच राहिलं.
घटनेच्या दिवशी काय घडले?
शनिवारी घरी परतताना दामिनीने आईसाठी वडापाव घेतला होता आणि आईला फोन करून ती घरी येत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही वेळातच ही दुर्दैवी घटना घडली. आपल्या मुलीला रक्ताच्या थारोळ्यात पाहून आई-वडिलांनी एकच हंबरडा फोडला. या घटनेने उपस्थितांचेही डोळे पाणावले.
प्रेमसंबंधातून हत्या?
साहिल आणि दामिनी हे एकाच ठिकाणी शिक्षण घेत होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते आणि त्यातूनच हा टोकाचा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपी साहिल धुरी याचा शोध पोलिस घेत असून पुढील तपास सुरू आहे.
एका कष्टाळू, हुशार मुलीच्या जाण्याने आणि एका कुटुंबाच्या आशा उद्ध्वस्त झाल्याने संपूर्ण वर्दे गावावर शोककळा पसरली आहे.
