सन २०२१ च्या महापुराची जखम अजूनही ताजी असताना चिपळूणकरांवर आणखी एक मोठं दुःख कोसळलं आहे. शहराला पुरमुक्त करण्यासाठी शासन स्तरावर आणि सामाजिक स्तरावर झटणारे दोन मोठे आधारस्तंभ एक वर्षाच्या आत काळाने हिरावून घेतले आहेत. माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या पाठोपाठ ज्येष्ठ अभिनेते स्व. नाना पाटेकर यांचेही निधन झाले असून, यामुळे चिपळूणचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे.
आजही चिपळूण शहर १००% पुरमुक्त झालेले नाही. दर पावसाळ्यात वाशिष्ठी आणि शिव नदीची पातळी वाढली की येथील व्यापारी, नागरिकांच्या काळजात धडकी भरते. गाळ उपसा, नदीचे रुंदीकरण आणि पूर नियंत्रण आराखडा यासाठी स्थानिक संघटना आणि लोकप्रतिनिधी गेली चार वर्षे सातत्याने लढा देत आहेत. या लढ्याला खरी ताकद दोन ठिकाणाहून मिळत होती.
जलसंपदा मंत्री म्हणून प्रदीर्घ अनुभव असलेल्या अजित दादांनी चिपळूणच्या पूर नियंत्रणासाठी थेट मंत्रालयातून निधी आणि परवानग्या मिळवून दिल्या होत्या. वाशिष्ठी नदी खोलीकरणाचा विषय त्यांनी स्वतः लावून धरला होता. पण २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमान अपघातात त्यांचे दुःखद निधन झाले.
दुसरीकडे ‘नाम’ फाउंडेशनच्या माध्यमातून नाना पाटेकर यांनी कोकणातील पूरग्रस्तांना सावरले. “कोकणचा माणूस कर्ज काढत नाही, आहे त्यात जगतो” असे म्हणत त्यांनी येथील शेतकऱ्यांच्या वेगळ्या समस्या समजून घेतल्या आणि जलसंधारण, थेट आर्थिक मदत आणि गावांना स्वयंपूर्ण बनवण्याचे काम सुरू केले. सिंधुदुर्गात त्यांनी कोकणात नामचा विस्तार करण्याचे वचन दिले होते. परंतु
आज सकाळी ८ ऑक्टोबर रोजी गोव्यातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
एका वर्षाच्या आत दोन्ही कर्तबगार व्यक्तींची एक्झिट झाल्याने चिपळूणकर हळहळले आहेत. जणू पुरमुक्तीच्या लढ्याला कुणाची तरी नजरच लागली, अशी खंत चिपळूणवासीयांकडून व्यक्त होत आहे.
