रत्नागिरी जिल्ह्यात तरुणाईला नशेच्या खाईत लोटणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करांवर प्रशासनाने सर्जिकल स्ट्राईक केला आहे. प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी २३ सप्टेंबर रोजी धडक निर्णय घेत एकाच दिवसात सहा कुख्यात ड्रग्ज तस्करांना जिल्ह्याबाहेर हाकलले आहे. या धडक कारवाईनंतर अंमली पदार्थांच्या अवैध धंद्यात असलेल्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ड्रग्जची खरेदी-विक्री वाढल्याच्या तक्रारी येत होत्या. शाळा-कॉलेज परिसरात तरुण पिढी व्यसनाच्या जाळ्यात अडकत असल्याने पालक वर्गात प्रचंड चिंता होती. याची गंभीर दखल घेत प्रांताधिकारी देसाई आणि पोलीस यंत्रणेने विशेष मोहीम हाती घेतली होती. एनडीपीएस कायदा १९८५ (NDPS Act) च्या विशेष अधिकारांचा वापर करत देसाई यांनी थेट कारवाईचे आदेश काढले.
जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले तस्कर
सचिन राजाराम म्हापूसकर, अरमान लियाकत धामस्कर, नजब असीफ मिरजकर, मस्तान मकदुम शेख, फुरकान यासिन फणसोपकर, अब्दुल रौफ इक्बाल डोंगरकरहे सहाही जण सातत्याने अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर धंद्यात सक्रिय असल्याचे ठोस पुराव्यांसह सिद्ध झाल्याने त्यांना थेट जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
जीवन देसाई ठरले ड्रग्ज माफियांसाठी कर्दनकाळ
हा काही पहिलाच दणका नाही. प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी २०२३ पासून ड्रग्ज माफियांविरोधात आरपारची लढाई सुरू केली आहे. केवळ गुन्हा दाखल करून सोडून देण्यापेक्षा अशा समाजकंटकांना मुळापासूनच उखडून टाकण्याचे धोरण त्यांनी अवलंबले आहे.
या नवीन कारवाईसह २०२३ पासून आजपर्यंत त्यांनी तब्बल २१ कुख्यात गुन्हेगारांना एनडीपीएस कायद्याखाली जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. एकाच अधिकाऱ्याने इतक्या मोठ्या प्रमाणात केलेली ही कारवाई रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे.
देसाई यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे जिल्ह्यातील ड्रग्जचे नेटवर्क कोलमडले असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्यापासून वाचली आहेत. प्रशासनाच्या या धडक मोहिमेचे सर्वसामान्य नागरिक आणि पालकांनी जोरदार स्वागत केले असून, “असाच दणका सुरू ठेवा” अशी मागणी होत आहे.
