सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असताना चिपळूण तालुक्यात महावितरणने दिलेल्या उत्कृष्ट आणि तत्पर सेवेबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
गणेशोत्सव काळात कोकणात अनेक कुटुंबे आपल्या मूळ गावी येतात. वर्षभर बंद असलेली घरे उघडली जातात आणि विजेचा वापर अचानक वाढतो. सणासुदीच्या काळात यामुळे महावितरणच्या यंत्रणेवर अतिरिक्त भार येतो आणि ओव्हरलोडिंगची समस्या निर्माण होते.
ही संभाव्य समस्या ओळखून चिपळूण विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय भामरे यांनी वेळीच पावले उचलली. काही वर्षांपूर्वी बंद पडलेला ५ MVA क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने दुरुस्त करून पुन्हा कार्यान्वित केला. त्यांच्या या समयसूचकतेमुळे गणेशोत्सव काळात तालुक्यात कुठेही ओव्हरलोडिंगची समस्या उद्भवली नाही.
या काळात चिपळूण शहरासह ग्रामीण भागात कुठेही दीर्घकाळ वीज पुरवठा खंडित झाला नाही. अखंडित वीज पुरवठ्यामुळे भाविकांना गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करता आला.
“सणासुदीच्या काळात नागरिकांना अखंडित वीज देणे हे आमचे कर्तव्य आहे. लोकांच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू शकलो, याचे आम्हाला समाधान आहे,” अशी प्रतिक्रिया कार्यकारी अभियंता धनंजय भामरे यांनी दिली आहे.
