सातबारा फेरफारासाठी 10 हजारांची लाच घेताना मंडळ अधिकारी उमेश राजेशिर्के याला रंगेहाथ पकडल्यानंतर चिपळूण तालुक्यात संतापाची लाट आहे. गेल्या चार महिन्यातील ही तिसरी कारवाई असून, यामुळे चिपळूणचे नाव भ्रष्टाचारासाठी बदनाम होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
जूनमध्ये आरोग्य विभागातील एक महिला डॉक्टर, ऑगस्टमध्ये सावर्डे मंडळातील अधिकारी जाधव आणि आता सप्टेंबरमध्ये राजेशिर्के असे एका पाठोपाठ एक अधिकारी जाळ्यात सापडत आहेत, पण या सगळ्यांमागे असलेले त्या-त्या खात्यातील ‘गॉडफादर’ मात्र मोकाट असल्याचा आरोप होत आहे.
हॉटेलमध्ये डील, कार्यालयात दहशत
राजेशिर्के याने तर सरकारी कार्यालय सोडून पाग परिसरातील हॉटेलमध्ये लाचेचा व्यवहार केला. इतकी हिंमत येते कुठून? यामागे वरिष्ठांचा वरदहस्त असल्याशिवाय छोटे अधिकारी इतके बिनधास्तपणे पैसे मागू शकत नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे
तलाठी कार्यालयापासून ते मंडळ अधिकारी कार्यालयापर्यंत प्रत्येक टेबलावर पैसे दिल्याशिवाय फाईल हलत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. सातबारा, फेरफार, वारस नोंद यासाठी एजंट आणि दलालांचे जाळे सक्रिय असून, त्यांना पाठीशी घालणारा गॉडफादर कोण, याचा शोध घेण्याची मागणी आता होत आहे.
केवळ लाच घेणाऱ्यावर कारवाई करून भागणार नाही, तर त्याला पाठीशी घालणाऱ्या आणि टक्केवारी घेणाऱ्या वरिष्ठांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी चिपळूणकरांमधून होत आहे. एसीबीने आता या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी करावी आणि या भ्रष्ट साखळीतील ‘गॉडफादर’ समोर आणावेत, अशीच जनतेची अपेक्षा आहे.
