अर्थतज्ञ म्हणून सुभाषराव चव्हाण यांची ओळख असली तरी त्यांचे व्यक्तिमत्व हे केवळ एकाच क्षेत्रापुरते मर्यादित नाही. ते खऱ्या अर्थाने अष्टपैलू आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्व आहेत. एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या लीलया पेलण्याची कला त्यांना अवगत आहे.
आपल्या कामाशी प्रामाणिक राहत असतानाच समाजातील दु:खी, गरीब, गरजू, बेरोजगार आणि आजाराने त्रस्त असलेल्या लोकांसाठी ते नेहमी मदतीचा हात पुढे करतात. समाजाविषयी मनात असलेली आपुलकी आणि तळमळ हेच त्यांच्या कार्याचे खरे प्रेरणास्थान आहे. ‘जे काही करायचे ते समाजासाठी’ हाच त्यांचा ध्यास आहे. आणि हा ध्यास पूर्ण करण्यासाठी त्यांनी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था हे प्रभावी माध्यम निवडले. ‘सहकारातून विकास’ हेच त्यांचे जीवनब्रिद बनले आहे आणि यासाठीच त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे.
१९ ऑक्टोबर १९९३ रोजी त्यांनी लावलेल्या चिपळूण नागरीच्या रोपट्याची आज वटवृक्षात रूपांतर होण्याची घौडदौड सुरू आहे. हा सहकाराचा रथ आता कोणीही रोखू शकत नाही. चिपळूणसारख्या छोट्या शहरातून सुरू झालेल्या या रथाला आज हजारो हातांचे बळ मिळाले आहे. विश्वास आणि पारदर्शकता ही या रथाची दोन चाके आहेत. उत्तम दर्जा, नियोजनबद्ध कारभार, ग्राहकांविषयीचे प्रेम आणि शंभर हत्तींचे बळ हीच या रथाची वैशिष्ट्ये आहेत. या रथावर स्वार होऊन सुभाषरावांची वाटचाल सहकाराच्या पंढरीकडे दिमाखात सुरू आहे. या वाटचालीत अनेक चढ-उतार आले, अडचणींचे डोंगर उभे राहिले, पण प्रत्येक अडचणीवर मात करत त्यांनी हा रथ अविरत पुढे नेला, हेच त्यांच्या कर्तृत्वाचे मोठेपण आहे.
केवळ पतसंस्था स्थापन करून ते थांबले नाहीत. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हजारो बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य केले. अनेकांची मोडकळीस आलेली घरे सावरली, अनेकांना स्वतःच्या पायावर उभे केले. छोटे व्यापारी, दुकानदार, विक्रेते यांच्यासाठी त्यांनी विशेष कर्ज योजना आणल्या. प्रत्येकाला स्वतःचे हक्काचे घर असावे, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी ‘घरकुल योजना’ सुरू केली. या योजनेमुळे आज अनेक बेघरांना हक्काचे छत मिळाले आहे आणि त्यांच्या आयुष्यात आनंद फुलला आहे.
समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या कृतज्ञ भावनेतून ते सतत काहीतरी नवे करण्याच्या विचारात असतात. म्हणूनच त्यांच्या डोक्यातून जनकल्याणाच्या अनेक योजना साकार होतात.
त्यांची दिनचर्या पाहिली तर त्यांच्या कामाची तळमळ लक्षात येते. सकाळी बरोबर नऊ वाजता बहादूरशेख नाका येथील प्रधान कार्यालयात त्यांचे आगमन होते. प्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून ते आपल्या कामाला सुरुवात करतात. भेटायला आलेल्या प्रत्येकाला वेळ देणे, कर्मचाऱ्यांकडून कामाचा आढावा घेणे, कर्ज प्रकरणांचा अभ्यास करणे, आर्थिक घडामोडींवर लक्ष ठेवणे हे त्यांचे रोजचे काम. केवळ एका जागी बसून आदेश देणे त्यांना मान्य नाही. दिवसभरात जास्तीत जास्त शाखांना प्रत्यक्ष भेटी देऊन ते कामकाजाची पाहणी करतात, अडचणी सोडवतात आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतात. वेळेचे किंवा जेवणाचे भान न ठेवता ते सतत लोकांच्या सेवेत मग्न असतात.
चिपळूण नागरीच्या आधीच १९८५ साली त्यांनी चिपळूण तालुका मराठा संघाची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठे काम केले आहे. आजही ते या संघाचे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. १९७१ साली रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत रुजू झाल्यानंतर त्यांनी सलग दहा वर्षे कर्मचारी संघटनेचे अध्यक्षपद भूषवले. व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यात सुसंवाद ठेवून त्यांनी बँकेचा कारभार सुरळीत ठेवला होता.
सामान्य ठेवीदारापासून ते शेतकरी, दूध उत्पादक, नोकरदार, विद्यार्थी असा एकही घटक नाही ज्याच्यासाठी त्यांनी योजना आणली नाही. लहान मुलांमध्ये बचतीची सवय लागावी म्हणून धनलक्ष्मी ठेव योजना, बेरोजगारांसाठी स्वयंरोजगार योजना, बेघरांसाठी घरकुल योजना, तसेच दैनंदिन ठेव, आवर्त ठेव, संकल्पपूर्ती ठेव, श्रावण मास ठेव अशा अनेक कल्याणकारी योजना चिपळूण नागरीच्या माध्यमातून यशस्वीपणे राबवल्या जात आहेत.
अशा या सहकार तपस्वीला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. त्यांच्या हातून अशीच समाजसेवा घडत राहो.
