सातबारा उताऱ्यावर फेरफार करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच घेताना चिपळूण महसूल विभागातील एका मंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. उमेश राजेशिर्के असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. या कारवाईमुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या महसूल वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदाराच्या सातबारा उताऱ्यात फेरफार करून देण्याच्या बदल्यात संबंधित मंडळ अधिकाऱ्याने 10 हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पथकाने सापळा रचला.
चिपळूण शहरातील पाग पॉवर हाऊस परिसरातील एका हॉटेलमध्ये तक्रारदाराकडून 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने अधिकाऱ्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
