चिपळूण साऊंड असोसिएशनची विशेष जाहीर सभा दि. २४ऑगस्ट रोजी श्री कृष्ण भवन, पाग येथे संपन्न झाली. या सभेत जुनी कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली. तसेच असोसिएशन नोंदणीकृत करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
नवीन कार्यकारिणीत माजी अध्यक्ष श्री. भूषण कांबळी यांची सर्वानुमते बिनविरोध अध्यक्ष म्हणून फेरनिवड करण्यात आली. जेष्ठ साऊंड व्यावसायिक श्री. नैनेश शेठ तांबडे यांची उपाध्यक्ष, तर संकेत कदम यांची द्वितीय उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. सचिव म्हणून जयेश बोबले, खजिनदार म्हणून बापू खराडे आणि सह-खजिनदार म्हणून सुहास अदावडे यांची नियुक्ती करण्यात आली.
सल्लागार मंडळात श्री. उदय जुवळे, कमलेश कोकाटे, संदिप पवार, रवि वाघे, सुनिल घोरपडे, गणेश निवाते, सर्वेश बांद्रे, सूरज दळवी, शुभम चव्हाण यांच्यासह सर्व सदस्यांचा समावेश आहे.
सभेची सुरुवात श्रीदेव काळभैरवाला ओवाळून व श्रीफळ वाढवून करण्यात आली. यावेळी डिके साहेब यांनी असोसिएशन रजिस्ट्रेशनचे महत्त्व व त्याचे फायदे समजावून सांगितले.
याचवेळी जेष्ठ साऊंड व्यावसायिक व नवनिर्वाचित नगरसेवक श्री. उदय जुवळे यांचा सत्कार करण्यात आला. सभेदरम्यान साऊंड व्यावसायिकांच्या समस्यांवर चर्चा करून त्या सोडवण्यात आल्या तसेच व्यवसायाचे दर निश्चित करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात भूषण कांबळी यांनी प्रशासनाच्या नियमांची माहिती दिली व भविष्यात सर्वांनी एकजूट राहून सामाजिक कार्यात योगदान द्यावे असे आवाहन केले. या सभेचे प्रस्तावना व सूत्रसंचालन संकेत कदम व बापू खराडे यांनी केले, तर आभार जयेश बोबले यांनी मानले.
