चिपळूण तालुक्यातील खांदाट पाली येथे घडलेली शाडू मातीची गणेशमूर्ती यंदा थेट अमेरिकेत पूजली जाणार आहे. येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार राजेश नरळकर यांनी साकारलेली पर्यावरणपूरक मूर्ती न्यू जर्सी येथे रवाना होत असून, चिपळूणच्या गणेशकलेने सातासमुद्र ओलांडला आहे.
कोकणातील गणेशोत्सव म्हटले की डोळ्यासमोर येते ती शाडू मातीतील रेखीव मूर्ती. हीच परंपरा चिपळूणच्या खांदाट पालीत नरळकर कुटुंब गेली अनेक पिढ्या जपत आले आहे. वडिलोपार्जित मूर्तीकलेचा वारसा राजेश नरळकर यांनी केवळ जपलाच नाही तर त्याला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली आहे.
यंदाचा योग विशेष ठरला आहे. खांदाट पाली येथील माहेर असलेल्या आणि सध्या अमेरिकेतील न्यू जर्सी येथे स्थायिक असलेल्या आंब्रे-सुर्वे कुटुंबीयांना परदेशातही कोकणचा अस्सल गणेशोत्सव साजरा करायचा होता. त्यासाठी त्यांनी पीओपी नव्हे, तर चिपळूणच्या मातीतील शाडूची मूर्ती हवी, असा आग्रह धरला आणि थेट राजेश नरळकर यांच्याशी संपर्क साधला.
वेळ अतिशय कमी होता. परदेशात मूर्ती पाठवायची म्हणजे पॅकिंग, शिपिंगच्या सर्व औपचारिकता पूर्ण कराव्या लागतात. तरीही नरळकर यांनी हे आव्हान स्वीकारले. दिवस-रात्र मेहनत घेऊन त्यांनी अत्यंत कमी वेळात सुबक, प्रसन्न आणि देखणी गणेशमूर्ती साकारली. त्यांच्या हातातील नाजूक कोरीव काम आणि आकर्षक रंगसंगतीमुळे मूर्तीला एक वेगळाच जिवंतपणा आला आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या युगातही राजेश नरळकर हे कट्टरपणे शाडू मातीच्या मूर्तींवरच ठाम आहेत. पर्यावरणाचा समतोल राखत, गणेशभक्तांना रेखीव आणि सात्विक मूर्ती देणे हाच त्यांचा ध्यास आहे. त्यामुळेच चिपळूण तालुक्यातील अनेक मंडळे आणि घरगुती गणपतींसाठी त्यांच्या मूर्तींना पहिली पसंती दिली जाते. मूर्तीकलेसोबतच ते उत्कृष्ट लाकूड कोरीवकाम आणि रांगोळी कलाकार म्हणूनही चिपळूण परिसरात परिचित आहेत.
या संपूर्ण प्रवासात त्यांच्या आई आणि कुटुंबीयांची त्यांना मोठी साथ मिळाली आहे.
चिपळूणच्या एका छोट्याशा गावातून घडलेली मूर्ती थेट अमेरिकेत जाऊन विराजमान होणार असल्याने चिपळूणकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे. राजेश नरळकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
