महाराष्ट्राची भाग्यरेखा असलेल्या कोयना धरणात यंदा पावसाने दमदार हजेरी लावली असून धरणातील पाणीसाठा १०० ते १०१ टीएमसीच्या पुढे गेला आहे. धरणाची एकूण साठवण क्षमता १०५.३२ टीएमसी असून सध्याचा साठा हा क्षमतेच्या ९५ ते ९६ टक्क्यांहून अधिक आहे. या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते शिवसागर जलाशयाचे विधिवत जलपूजन आणि ओटीभरण करण्यात आले.
कोयना धरणस्थळी झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभय काटकर, प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव, कार्यकारी अभियंता महेश रासनकर आदी अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री काय म्हणाले?
जलपूजनानंतर बोलताना पालकमंत्री देसाई म्हणाले, “कोयना धरणास महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून ओळखले जाते. पश्चिम महाराष्ट्राच्या भरभराटीत या धरणाचा मोलाचा वाटा आहे. सध्या धरणात १०१ टीएमसी साठा आहे आणि ९९ हजार क्युसेकने विसर्ग सुरु आहे. कोयनामाईची कृपा अशीच राहून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा, पाण्याची टंचाई भासू नये आणि मुबलक वीज निर्मिती व्हावी यासाठी हे पूजन आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, धरण क्षेत्रात अजूनही पाऊस सुरू असून पूरस्थितीवर प्रशासनाचे लक्ष आहे. कोयना व पाटण भागातील काही कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले असून त्यांच्या निवारा, जेवण, पिण्याचे पाणी याची सोय करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरू नये, प्रशासन खंबीरपणे पाठीशी आहे.
गेल्या २४ तासात कोयनानगर येथे ३१ मिमी, नवजा येथे ६१ मिमी तर महाबळेश्वर येथे ६३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पाणलोट क्षेत्रात येणारी आवक पाहून विसर्गाचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी जलसंपदा विभागाला दिल्या आहेत.
