छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेला ३५९ वर्षे पूर्ण होत असताना, चिपळूणच्या एका सुपुत्राने आपल्या ५० व्या वाढदिवशी इतिहासाला साजेशी मानवंदना देण्याचा निर्धार केला आहे.
मूळचे चिपळूणचे सुपरिचित सायकलपटू आणि मल्लखांबपटू हेमंत यशवंत भोसले (वय ५०) यांनी ‘आग्रा ते राजगड – शिवसुटका मार्ग’ सायकल मोहीम हाती घेतली आहे. दि. १७ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट या कालावधीत ते हा सुमारे १४०० किमीचा खडतर प्रवास सायकलवर पूर्ण करीत आहेत. याच मोहिमेदरम्यान दि. २३ ऑगस्ट रोजी त्यांचा ५० वा वाढदिवस साजरा होत आहे.
पागेवरून घडलेले व्यक्तिमत्व
२३ ऑगस्ट १९७६ रोजी चिपळूणात जन्मलेले हेमंत भोसले हे बस चालक यशवंत भोसले (आप्पा) आणि वनिता भोसले यांचे सुपुत्र. पागेवरील मराठी शाळा, युनायटेड इंग्लिश स्कूल आणि डी.बी.जे. कॉलेज हे त्यांचे शिक्षण. वयाच्या १० व्या वर्षी शशिकांत वरवडेकर आणि शांताराम जोशी गुरुजींकडे मल्लखांबाची सुरुवात करून त्यांनी राज्यस्तरावर प्रथम क्रमांक आणि डी.बी.जे. कॉलेजचा प्रतिष्ठित कडवेकर पुरस्कार मिळवला होता.
सायकलिंगमध्येही त्यांनी चिपळूणच्या १५ ऑगस्ट स्पर्धेपासून ते रत्नागिरी जिल्हास्तरीय स्पर्धांपर्यंत आपले वर्चस्व निर्माण केले होते. सध्या ते भुस्कुटे बंधू यांच्या आस्थापनेत बस चालक आणि सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत.
कोरोनावर मात करून मिळाले नवे जीवन
२०२१ मध्ये कोरोनाने गंभीर अवस्था झालेल्या हेमंत भोसले यांना अपरांत हॉस्पिटल आणि नंतर मुंबईच्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन जीवदान मिळाले. हा आपला पुनर्जन्म आहे असे मानून त्यांनी आरोग्यासाठी सायकलिंगला वाहून घेतले. आजवर त्यांनी ३०,००० किमी पेक्षा जास्त सायकलिंग, आंतरराष्ट्रीय टूर दी हंड्रेड मध्ये भारतात ५ वा क्रमांक, सुपर रँडोनियर (SR) पदवी, चिपळूण-गोवा, चिपळूण-पंढरपूर सलग दोन वर्षे वारी असे विक्रम केले आहेत. ते आजही रोज ५० किमी सायकल चालवतात.
“छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका हा स्वराज्याच्या इतिहासातील पुनर्जन्माचा क्षण होता. त्याच मार्गावर माझा ५० वा वाढदिवस साजरा करण्याचे भाग्य मला मिळत आहे, हीच महाराजांच्या अचाट शौर्याला आणि कर्तृत्वाला माझी आदरांजली आहे,” असे भोसले यांनी सांगितले.
त्यांचा मुलगा अथर्व भोसले हा देखील सायकलिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावर चमकत असून, त्याच्याकडून आपली स्वप्ने पूर्ण करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
