संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे सुवारेवाडी येथे शुक्रवारी पहाटे भीतीदायक घटना घडली. कोंबड्यांच्या शोधात एक बिबट्या थेट घरात घुसला आणि त्याने 60 वर्षीय महिलेवर हल्ला केला. मात्र प्रसंगावधान राखत त्या महिलेने तब्बल अर्धा तास बिबट्याशी झुंज देत स्वतःचा जीव वाचवला.
कोंबड्यांमागे घरात शिरला बिबट्या
ही घटना पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडली. वांझोळे येथील प्रतिभा प्रकाश दळवी या घरात असताना बिबट्या कोंबड्यांचा पाठलाग करत घरात शिरला. आत आल्यावर त्याने घरातील कोंबड्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले. याच वेळी प्रतिभा दळवी यांच्यासमोर बिबट्या आला.
दार उघडून केला जीवाचा बचाव
घाबरण्याऐवजी प्रतिभा दळवी यांनी मोठे धाडस दाखवले. अर्धा तास त्यांनी प्रसंगावधान राखून स्वतःचा बचाव केला. त्यानंतर संधी साधत त्यांनी घराचा पुढचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच बिबट्याने बाहेर पळ काढत थेट जंगलाचा रस्ता धरला. या झटापटीत प्रतिभा दळवी जखमी झाल्या.
रुग्णालयात उपचार सुरू
जखमी झालेल्या प्रतिभा दळवी यांना तातडीने देवरुख ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारांसाठी त्यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच वांझोळे ग्रामस्थांसह वनपाल सागर गोसावी, वनरक्षक सहगोय कराडे आणि माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली.
ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
करंबेले शेवरवाडी परिसरात आधीच बिबट्याचा वावर होता. त्यातच आता वांझोळे येथे घरात घुसून महिलेवर हल्ला झाल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे.
बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करून गावकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
वन विभागाकडून परिसरात पिंजरे लावून बिबट्याचा शोध सुरू असल्याची माहिती आहे.
