गणेशोत्सवाच्या आधीच एक हृदयद्रावक घटना घडली आहे. गुहागर तालुक्यातील बुधल समुद्रकिनाऱ्यावर मासेमारीसाठी गेलेल्या चिपळूणच्या गोवळकोट भागातील दोन तरुणांना काळाने गाठले. समुद्राच्या लाटांमध्ये सापडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
माहितीनुसार, हे दोघेही बुधल किनाऱ्यावरील खडकांवर फिशिंग रॉड घेऊन मासे पकडत होते. अचानक आलेल्या मोठ्या लाटांनी त्यांना आपल्या कवेत घेतले आणि समुद्रात ओढले. किनाऱ्यावर असलेल्या स्थानिकांनी ही घटना पाहताच आरडाओरडा केला.
घटनेची माहिती मिळताच गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने पोलीस आणि बचाव पथकाला पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही मृतदेह बाहेर काढले आणि पंचनामा केला.
या घटनेने चिपळूणच्या गोवळकोट परिसरात शोककळा पसरली आहे. समुद्रकिनाऱ्यावर जाताना खबरदारी घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. पुढील तपास गुहागर पोलीस करत आहेत.
