चिपळूण तालुक्यातील वालोपे गणेशवाडी येथे आज सायंकाळी अंगावर शहारे आणणारी घटना घडली. घराच्या मागे असलेल्या वाशिष्ठी नदीच्या घाटावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या मगरीने जीवघेणा हल्ला केला. पण या मृत्यूच्या दाढेतून तिला तिच्याच 10 वर्षाच्या चिमुकल्या मुलीने वाचवलं. वाशिष्ठी नदीत घडलेल्या या थरारक घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
नंदिनी भुपेंद्र पवार (वय 35, रा. वालोपे गणेशवाडी) या आज सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आपली 10 वर्षांची मुलगी स्वर्णी हिच्यासोबत नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुत असतानाच पाण्यात दबा धरून बसलेल्या अजस्त्र मगरीने अचानक त्यांच्यावर झडप घातली. क्षणार्धात मगरीने नंदिनी यांचा पाय जबड्यात पकडून त्यांना खोल पाण्यात ओढण्यास सुरुवात केली.
अचानक झालेल्या या हल्ल्याने नंदिनी घाबरून गेल्या आणि जीवाच्या आकांताने किंचाळू लागल्या. मगर पाण्यात ओढत असताना त्यांनी प्रसंगावधान राखत एका हाताने काठावरील मोठ्या दगडाला घट्ट पकडून धरले.
आईला मगरीने ओढल्याचे पाहताच 10 वर्षाची स्वर्णी घाबरली नाही. ती थेट आईच्या मदतीला धावून आली. तिने आईचा हात घट्ट पकडला आणि आपल्या इवल्याशा हातांनी सर्व शक्तीनिशी पाण्याबाहेर खेचले. लेकीच्या या धाडसामुळेच नंदिनी यांचा जीव वाचला.
या थरारानंतर जखमी नंदिनी यांना तातडीने कामथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वनविभागाची तातडीने धाव
ही माहिती मिळताच चिपळूणचे वनपरिक्षेत्र अधिकारी सरवर खान यांनी तातडीने हालचाली केल्या. त्यांनी वनपाल एस.एस. सावंत, वनरक्षक के.डी. इरमले (कोळकेवाडी), वनरक्षक रा.भा. गुंटे (रामपूर), लिपिक एस.ए. कलावंत आणि आर.आर.टी. मेंबर अथर्व घाग यांच्यासह कामथे रुग्णालयात धाव घेतली.
वन अधिकाऱ्यांनी जखमी नंदिनी पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि “घाबरू नका, वनविभाग तुमच्या पाठीशी आहे” असा धीर दिला.
वनविभागाचे महत्त्वाचे आवाहन
दरम्यान, या घटनेनंतर वनविभागाने नागरिकांना गंभीर इशारा दिला आहे.”सध्या पावसाळ्यामुळे वाशिष्ठी नदीत मोठ्या प्रमाणात मगरींचे वास्तव्य आहे. त्यामुळे कोणीही पोहण्यासाठी, कपडे धुण्यासाठी किंवा जनावरे धुण्यासाठी नदीवर जाऊ नये. तसेच लहान मुलांना चुकूनही नदीकिनारी किंवा पाण्यात उतरवू नये’ असे आवाहन श्री. खान यांनी केले आहे.
दरम्यान,10 वर्षाच्या स्वर्णीच्या या शौर्याची संपूर्ण चिपळूणमध्ये चर्चा सुरू आहे.
