कर्तव्यनिष्ठा, गुन्हे अन्वेषणातील कौशल्य आणि नागरिकांशी असलेला सुसंवाद यामुळे चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट सेवा पदक’ साठी निवड झाली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून मेंगडे चिपळूण पोलीस ठाण्याचा कार्यभार सांभाळत आहेत. या अल्पावधीत त्यांनी चिपळूण शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासोबतच अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल केली आहे. त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वामुळे चिपळूण पोलिसांचे नाव राज्यभरात गाजले आहे.
चोरी, घरफोडी, वाहनचोरी तसेच शहरातील कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न अत्यंत कौशल्याने हाताळून गुन्हेगारांना धडा शिकवण्याचे काम त्यांनी केले. नागरिकांच्या तक्रारींना तातडीने प्रतिसाद देणे आणि पोलीस-दलात शिस्तप्रियता आणणे यासाठीही त्यांची विशेष ओळख आहे.
मेंगडे यांच्या या निवडीमुळे संपूर्ण चिपळूण तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पोलीस दलातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीही ही निवड प्रेरणादायी ठरली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल चिपळूणकर नागरिक, सामाजिक संघटना आणि लोकप्रतिनिधींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
