ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संस्कार आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याची सवय निर्माण झाली, तर हीच मुले भविष्यात सक्षम समाज घडवतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य तसेच युवा सेना कोर कमिटी सदस्य आणि कोकण विभाग सचिव श्री. विकास शेठ गोगावले यांनी केले.
८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त चांभारखिंड येथील जिल्हा परिषद शाळेत नव्याने सुरू करण्यात आलेल्या इंग्रजी लॅबचे उद्घाटन श्री. विकास शेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत स्वातंत्र्य दिनाचा आनंद विद्यार्थ्यांसोबत साजरा केला.
इंग्रजी लॅबच्या उद्घाटनानंतर विकास शेठ गोगावले यांनी विद्यार्थ्यांमध्ये कोणताही औपचारिकपणा न ठेवता चक्क जमिनीवर बसून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी, इंग्रजी विषयाबद्दलची आवड, भविष्यातील ध्येय तसेच शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली.
विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारत विकास शेठ गोगावले यांच्याशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी इंग्रजी भाषा आत्मविश्वासाने शिका, नवनवीन गोष्टी जाणून घ्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आपले ज्ञान वाढवा, असे आवाहन केले.
नव्याने सुरू करण्यात आलेल्या इंग्रजी लॅबमुळे विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे श्रवण, संभाषण, वाचन आणि लेखन या चारही कौशल्यांचा सराव आधुनिक पद्धतीने करता येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच आधुनिक शिक्षणाच्या सुविधा मिळाव्यात आणि त्यांच्या गुणवत्तेला योग्य व्यासपीठ मिळावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
“चिमुकल्या डोळ्यांत मोठी स्वप्नं असतात आणि त्या स्वप्नांना बळ देण्याची जबाबदारी आपली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला चांगले शिक्षण आणि योग्य संधी मिळाली, तर तो आपल्या कुटुंबासह गावाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करू शकतो,” असा विश्वास विकास शेठ गोगावले यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांसोबत जमिनीवर बसून त्यांनी साधलेल्या मनमोकळ्या संवादातून त्यांचा साधेपणा, विद्यार्थ्यांप्रती असलेली आपुलकी आणि शिक्षणाबद्दलची सकारात्मक भूमिका यावेळी प्रकर्षाने दिसून आली. उपस्थित पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी सिद्धी खांबे, गणेश खांबे, जयंत पवार, दीपक शेडगे, सरपंच तुकाराम पालकर, उपसरपंच रामदास पारावे, लक्ष्मण पेंढारी, सुशांत चिले , भाऊ पेंढारी, राजू उमासरे यांच्यासह शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
